दान करण्यासाठी श्रीमंत असणं आवश्यक नाही, परंतु तुम्ही मनाने किती श्रीमंत आहात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्नाटकातील रायचूर येथील एका ६० वर्षीय महिलेने हे खरं करून दाखवलं आहे. ही महिला स्वतः भीक मागून उदरनिर्वाह करत आहे, परंतु तिने तिच्यासाठी साठवलेले पैसे दान केले आहेत. भीक मागणाऱ्या महिलेने दिलेली रक्कम ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. महिलेने एक हजार किंवा दोन हजार नाही तर तब्बल १.८३ लाख रुपये दान केले आहेत.
६० वर्षीय रंगम्मा यांनी भीक मागून पैसे जमवले होते. त्यांनी आता सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. रायचूरच्या बिजनगरा तालुक्यातील अंजनेय मंदिराचं नूतनीकरण होणार आहे ज्यासाठी महिलेने ही रक्कम दान केली. रंगम्मा यांच्या या देणगीबद्दल ऐकून सर्वांना आश्चर्य वाटलं आहे आणि ते तिचं कौतुक करत आहेत. रंगम्मा गेल्या ६ वर्षांपासून भीक मागून पैसे गोळा करत होती. तिने हे पैसे तीन पोत्यांमध्ये ठेवले होते. हे पैसे मोजण्यासाठी २० हून अधिक लोकांना ६ तास लागले.
रंगम्मा सुमारे ४० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातून बिज्जनेगरा गावात आल्या होत्या. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंगम्मा तेव्हापासून भीक मागत आहेत. रंगम्मा यांच्या नोटा मोजल्या गेल्या तेव्हा त्यांच्या सुमारे २० हजार रुपयांच्या नोटा खराब झाल्या होत्या. यापूर्वी रंगम्मा यांनी गावकऱ्यांच्या मदतीने भीक मागून मिळवलेल्या सुमारे १ लाख रुपयांपासून घर बांधलं होतं.
रंगम्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण दिलेल्या देणगीमुळे त्या खूपच आनंदी आहेत. गावकऱ्यांनी रंगम्मा यांनी पेट्या आणि गठ्ठ्यांमध्ये ठेवलेले पैसे पाहिले होते. त्यानंतर त्या म्हणाल्या की, मंदिराच्या नूतनीकरणासाठी त्या दान करू इच्छित आहेत. गावकऱ्यांना देखील त्यांचं कौतुक वाटत आहे. या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.