उन्हाळा सुरू झाला की बाजारात लालचुटूक आणि रसाळ कलिंगडांची मागणी वाढते. पण, बाहेरून हिरवेगार आणि आतून 'लाल' दिसणारं कलिंगड आरोग्यासाठी चांगलं असेलच असं नाही. सध्या बाजारात अधिक नफ्यासाठी कलिंगडांमध्ये भेसळ किंवा कृत्रिम रंगांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कलिंगड खरेदी करताना आणि खाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी कलिंगड हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र, कृत्रिमरित्या पिकवलेलं, केमिकल वापरलेलं कलिंगड खाल्ल्याने अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होऊ शकते. म्हणून कलिंगड निवडताना खालील गोष्टी आवर्जून तपासा:
१. पिवळा डाग असलेले कलिंगड निवडा (The Field Spot)
कलिंगड विकत घेताना त्यावर एक मोठा पिवळसर किंवा नारंगी रंगाचा डाग आहे का ते पहा. याला 'फील्ड स्पॉट' म्हणतात. याचा अर्थ असा की ते कलिंगड जमिनीवर पडून नैसर्गिकरित्या वेलीवरच पिकले आहे. जर कलिंगड पूर्णपणे हिरवे असेल, तर ते कच्चे असतानाच तोडलेले असू शकते. जे चवीला गोड लागणार नाही.
२. आतून 'पोकळ' असणे धोक्याचे संकेत
कलिंगड कापल्यावर जर ते मध्यभागी खूप पोकळ किंवा फाटलेले (Cracked) दिसत असेल, तर सावध व्हा. अनेकदा कलिंगडाची वाढ झपाट्याने करण्यासाठी 'नायट्रेट' किंवा 'ऑक्सिटोसिन' सारखी इंजक्शन्स दिली जातात. अशा कलिंगडांची नैसर्गिक वाढ न होता ती रातोरात फुगतात, ज्यामुळे ती आतून पोकळ राहतात.
३. बियांचे निरीक्षण करा
ज्या कलिंगडामध्ये बिया नसतात (Seedless) किंवा अतिशय कमी असतात, ते बऱ्याचदा हायब्रीड किंवा जेनेटिकली मॉडिफाईड असू शकतात. नैसर्गिकरित्या पिकलेल्या अस्सल गावरान कलिंगडात काळपट किंवा गडद तपकिरी बिया भरपूर प्रमाणात असतात.
४. पाण्याची चाचणी (Water Test)
कलिंगड भेसळयुक्त आहे की नाही हे तपासण्यासाठी एक तुकडा पाण्याच्या भांड्यात टाका. जर पाणी लगेच लाल किंवा गुलाबी झाले, तर समजा त्यात 'एरिथ्रोसिन' (Erythrosine) सारखे कृत्रिम रंग वापरले आहेत. नैसर्गिक कलिंगडामुळे पाणी लाल होत नाही.
५. टिश्यू पेपर टेस्ट
कलिंगड कापल्यानंतर त्यावर एक पांढरा टिश्यू पेपर ठेवा आणि हलके दाबा. जर टिश्यू पेपरला गडद लाल रंग लागला, तर ते कलिंगड कृत्रिम रंगाने इंजेक्ट केलेले असू शकते. नैसर्गिक रसाचा डाग फिकट असतो आणि तो कागदावर लगेच गडद रंग सोडत नाही.
ग्राहकांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स:
जास्त लाल रंगाला भुलू नका: केवळ रंग बघून कलिंगड घेऊ नका.
आकार तपासा: कलिंगड जास्त ओबडधोबड नसावे, त्याचा आकार समप्रमाणात असावा.
ठोकून पहा: कलिंगड हाताने ठोकून पाहिल्यावर जर 'ठब-ठब' असा जड आवाज आला तर ते भरीव आणि रसाळ आहे असे समजा.
