प्रेमात असलेल्या तुमच्या जोडीदाराला 'लव्ह बाईट' करणं हे अत्यंत सामान्य आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की, लव्ह बाईट तुमच्या आरोग्यासाठी खतरनाक आहे. रक्त गोठणं, त्वचा काळी-निळी पडणं आणि सूज येणं यासारख्या समस्यांव्यतिरिक्त, तुम्हाला काही गंभीर समस्यांना देखील तोंड द्यावं लागू शकतं. यामुळे स्ट्रोकचा मोठा धोका आहे. लव्ह बाईटमुळे लहान रक्तवाहिन्या तुटतात. या तुटलेल्या रक्तवाहिन्यांमधून पेटेचिया नावाचे रक्ताचे छोटे डाग पडतात ज्यामुळे त्वचा नंतर लाल होते किंवा काळी-निळी, जांभळी पडते. काही दिवसांनंतर त्वचेचा रंग सामान्य होतो.
बंगळुरूच्या स्पर्श रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. नितीन कुमार एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कपल फोरप्ले करतात. तेव्हा मानेवर किस करताना जोरात दाब पडल्याने लाल-निळ्या रंगाच्या खुणा दिसतात त्यालाच लव्ह बाईट म्हणतात. लव्ह बाईट सामान्यतः गंभीर मानलं जात नाही परंतु अलिकडच्या काळात लव्ह बाईटमुळे होणाऱ्या समस्या समोर आल्यामुळे माहिती देणं महत्त्वाचं आहे.
'लव्ह बाईट'मुळे उद्भवू शकतात 'या' ३ समस्या
- 'लव्ह बाईट'मुळे तीन प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. एक म्हणजे कॅरोटिड सायनस. मानेच्या बाजूला मज्जातंतू पेशींचा एक समूह असतो, म्हणून जेव्हा जेव्हा कोणी लव्ह बाईट करतं तेव्हा या मज्जातंतू पेशी सक्रिय होतात आणि त्या पेशी हृदयाशी जोडल्या जातात त्यामुळे त्यांच्यात हृदयाचे ठोके कमी होण्याची किंवा ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. चक्कर येऊ शकते, तुम्ही खाली पडू शकता.
- मानेच्या रक्तवाहिन्यांमध्ये आधीच रक्ताची गुठळी असेल आणि जर कोणी लव्ह बाईटद्वारे त्या रक्तवाहिन्यांवर जास्त दबाव आणला तर त्या गुठळ्या पुढे सरकून डोक्याकडे जाण्याची शक्यता असते. जेव्हा रक्ताच्या गुठळ्या मेंदूपर्यंत पोहोचतात तेव्हा स्ट्रोक येऊ शकतो.
- मानेवर जोराच किस घेतल्याने, मानेच्या नाजूक रक्तवाहिन्या तुटण्याची आणि त्यांचा थर फाटण्याची शक्यता असते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात आणि रक्त बाहेर येऊ शकते. म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती खूप संवेदनशील असते तेव्हा अशा गोष्टींबद्दल सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
२०११ मध्ये न्यूझीलंडमधील एका महिलेला 'लव्ह बाईट'मुळे अर्धांगवायू झाला. डॉक्टरांना तिच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या आढळल्या आणि तिच्यावर स्ट्रोकचा उपचार करण्यात आला. हेल्थलाइनच्या मते, 'लव्ह बाईट'मुळे कधी कधी जास्त त्रास होत नाही. परंतु जर 'लव्ह बाईट'च्या खुणा बराच काळ जात नसतील, जास्त वेदना होत असतील, एक गाठ तयार झाली असेल, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.