lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > अभ्यास कधी करावा? पहाटे उठून की रात्री जागून? कधी केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो?

अभ्यास कधी करावा? पहाटे उठून की रात्री जागून? कधी केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो?

घरातली मोठी माणसं सतत मुलांना सांगतात पहाटे उठून अभ्यास कर, पण तसं करणं केव्हा योग्य ठरतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 08:00 AM2024-03-24T08:00:00+5:302024-03-24T08:00:01+5:30

घरातली मोठी माणसं सतत मुलांना सांगतात पहाटे उठून अभ्यास कर, पण तसं करणं केव्हा योग्य ठरतं?

When to study? Waking up early or waking up at night? When do you remember the study more? | अभ्यास कधी करावा? पहाटे उठून की रात्री जागून? कधी केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो?

अभ्यास कधी करावा? पहाटे उठून की रात्री जागून? कधी केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो?

Highlightsअभ्यासासाठी कोणती वेळ चांगली, या प्रश्नाचं एकच असं उत्तर सगळ्यांना लागू पडू शकत नाही.

- डॉ. श्रुती पानसे

अभ्यास करण्याची योग्य अशी वेळ असते का? पहाटे उठून केलेला अभ्यास खरंच लक्षात राहतो का? रात्री जागून अभ्यास केला तर त्याचे फायदे होतात की तोटे? परीक्षा जवळ आल्या की आईबाबा लोक ‘पहाटे उठून अभ्यास कर’ म्हणून मागे लागतात. शाळेतले शिक्षकही असं म्हणतात की, पहाटे लवकर उठून अभ्यास करावा. ती वेळ अभ्यासासाठी चांगली असते. तेव्हा वातावरण शांत असतं, मनाची ग्रहणशक्ती चांगली असते. तेव्हा केलेला अभ्यास जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात राहतो. यासाठी पहाटे उठून अभ्यास करण्याचा आग्रह धरला जातो.

एका अर्थाने हे खरं आहे की, शांत वातावरणात अभ्यास एकाग्रतेनं होतो. मात्र यासाठी रात्री लवकर झोपायला पाहिजे. पूर्वीच्या काळी माणसं खूपच लवकर झोपायची. त्यामुळे झोप पूर्ण होऊन पहाटे उठायची. अशा परिस्थितीत अभ्यास चांगला होणारच. पहाटे उठल्यावर जांभया येतात. काय वाचत आहोत, इकडे लक्ष राहत नाही. कदाचित सुरुवातीचे काही दिवस असं होईल; पण एकदा पहाटे उठून अभ्यास करायची सवय लागली की असा त्रास होणार नाही.

(Image :google)

करायचे काय?

१. रात्रीची झोप नीट झालीच पाहिजे आणि तीसुद्धा रोज. आपण एखादा दिवस असा काढू शकतो; पण दुसऱ्या दिवशी याचा त्रास होतो, म्हणून जर तुम्हाला पहाटे उठायचंच असेल तर रात्रीची झोप पूर्ण होण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. झोप नीट झाली तर कोणत्याही वेळेला मन लावून केलेला अभ्यास पुरेसा असतो.
२. काहींना सहा तासांची कमी झोपसुद्धा पुरते; तर काहींना आठ तास होऊनही डोळ्यांवर झापड असते, जास्त किंवा पुरेशा झोपेची गरज असते. रात्री लवकर झोपून, झोप पूर्ण करून पहाटे अभ्यासासाठी उठणं चांगलंच!
३. काही घरांमध्ये प्रत्येकाला झोपताना मोबाइल फोन लागतो. रात्रीची वेळ निवांत असल्यामुळे आपण किती वेळ काय बघत आहोत याचं भान राहात नाही. अभ्यास सोडून मोबाइल बघूच नये आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा रात्री जागून तर नाहीच नाही.

(Image :google)

अभ्यासाचा कंटाळा कुणाला येतो.. तुम्हाला की तुमच्या मेंदूला?

ज्यांच्या घरात रात्री लवकर झोपणं शक्य आहे, त्यांनी अवश्य पहाटे उठावं; पण ज्यांच्या घरात माणसं उशिरा घरी येतात, जेवणं उशिरा होतात, त्यामुळे जिथे झोपायलाच रात्रीचे अकरा-बारा वाजतात, तिथे पहाटे उठणं शक्य होणार नाही. त्यामुळे ज्या घरात मुलं शिकत आहेत, अशा घरांनी रात्री लवकर कामे आवरायला हवीत. ते शक्य नसेल तर मुलांनी आपापला दिनक्रम आखून लवकर झोपावं आणि लवकर उठावं.
अभ्यासासाठी कोणती वेळ चांगली, या प्रश्नाचं एकच असं उत्तर सगळ्यांना लागू पडू शकत नाही. प्रत्येकाने आपली वेळ ठरवणं योग्य राहील.

(लेखिका 'अक्रोड' उपक्रमाच्या संचालक आहेत.)
ishruti2@gmail.com

Web Title: When to study? Waking up early or waking up at night? When do you remember the study more?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.