सायली कुलकर्णी, (मानसोपचारज्ज्ञ)
शाळेत अनेक शिक्षकांना एक गोष्ट वारंवार जाणवते. एखादा मुलगा अभ्यासात हुशार, पटकन समजून घेणारा, अभ्यासाबाबतच सगळं नीट लक्षात ठेवणारा असतो; पण प्रत्यक्ष व्यवहारात मात्र अगदी उलट! घरातही पालक म्हणतात, “त्याला सगळं कळतं... तरीही कसा काय बावळटासारखा वागतो, मूर्खासारखे निर्णय घेतो?” बुद्धिमत्ता (IQ) चांगली असताना देखील तर्कशुद्ध विचार न करता येणे याला मानसशास्त्रात ‘डिसरॅशनलिया’ म्हणतात. यामध्ये मुलांकडे समज तर असते; पण तर्कशुद्ध विचार वापरण्याची क्षमता कमी असते. बुद्धी असते; पण विवेकी विचार करण्याची क्षमता नसते.
उदाहरण सांगते, इयत्ता आठवीतला राहुल अभ्यासू. धडे त्याला पटकन समजतात, गृहपाठ वेळेत होतो, स्मरणशक्तीही उत्तम; पण त्याचं सामान्य वर्तन मात्र वेगळंच! छोट्या-छोट्या गोष्टींवर तीव्र भावनिक प्रतिक्रिया देतो. परिणाम माहीत असूनही इम्पलसिव्ह, गडबडीने निर्णय घेतो. सूचनांचे चुकीचे अर्थ काढतो. मित्रांच्या प्रभावाखाली सहज जातो. बरोबर काय आहे, हे माहिती असूनही त्याच्याविरुद्ध वर्तन करतो. कळतं; पण वळत नाही. या प्रकारच्या राहुलच्या वर्तनाची लक्षणे. ‘डिसरॅशनलिया’ची ही लक्षणं. माहिती तर सगळी असते; पण विचार प्रक्रिया तर्कशुद्ध नसते.
डिसरॅशनलिया म्हणजे काय?
डिसरॅशनलिया म्हणजे, IQ सरासरी किंवा त्यापेक्षाही जास्त असूनही मुलाला रोजच्या आयुष्यात तर्कशुद्ध, लॉजिकल विचार करायला अडचण येते. अशा मुलांमध्ये पुढील गोष्टी ठळकपणे दिसतात.
१. निर्णय घाईगडबडीत घेणे.
२. गडबडीने निष्कर्ष काढणे.
३. परिस्थितीचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावणे.
४. परिणामांचा योग्य अचूक अंदाज बांधता न येणे.
५. विचारात लवचिकता नसते.
६. एकाच विचारावर हट्टाने अडून बसणे.
७. फक्त माझंच बरोबर अशी विचारसरणी दिसून येणे.
८. ज्ञान असूनही प्रत्यक्ष वर्तनात लागू न करणे.
९. तार्किकतेचा अभाव स्पष्ट दिसून येणे.
हे का घडतं?
बरेचदा वय वाढल्यावर किंवा मॅच्युरिटी आल्यावर तर्कशुद्ध विचारांमध्ये आपोआप वाढ होणे अपेक्षित असते; परंतु काहींच्या बाबतीत त्याचा अभाव जाणवतो. यामागील कारणे लक्षात घेऊयात-
१. भावना आणि लॉजिक यातील समतोल राखण्यास असमर्थता.
२. यांच्याबाबत भावना नेहमीच वरचढ ठरतात, लॉजिक हरवते.
३. स्वविचार (Metacognition) कमी. मी जे विचार करतो/करते ते बरोबर आहे का? हा प्रश्नच पडत नाही.
४. मित्रांच्या दबावाला सहज बळी पडण्याची वृत्ती.
५. पालक जसे विचार करतात, मुले तेच कॉपी करतात.
६. अनेकदा पालकही अनाहूतपणे अती प्रतिक्रिया देतात. त्यानं घोळ वाढतो.
त्यामुळे होतं काय?
डिसरॅशनलिया असलेल्या व्यक्तींना कागदोपत्री चांगले गुण मिळत असतीलही मात्र त्यांच्या आयुष्याचे गणित चांगलेच बिघडलेले दिसते. लहान वयातच मुलांच्या डिसरॅशनलिया बाबत ठोस पाऊल उचलले गेले नाही तर पुढील आयुष्यात त्यांना अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की,
सततची भावनिक अस्थिरता, मित्रांचं अती ऐकणं, भावनेच्या भरात वागणं, नाती जपणं जमत नाही, आत्मविश्वास कमी, जबाबदारी टाळण्याची वृत्ती, नियोजन जमत नाही, सतत ॲनझायटी, पॅनिक अटॅकची शक्यता.
डिसरॅशनलिया हे डिसऑर्डर आहे का?
मानसशास्त्रीय दृष्ट्या ‘डिसरॅशनलिया’ म्हणजे विचार पॅटर्नचे अंतर (thinking gap) आहे.
यात पूर्णपणे सुधारणा शक्य आहे. वेळीच याबाबत पाऊले उचलल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास ही समस्या आटोक्यात आणता येते. उशीर झाल्यास मात्र भावनिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणी वाढतात आणि पुढे जाऊन गंभीर मानसिक समस्या उद्भवू शकतात. लक्षात घ्या, डिसरॅशनलियाचा संबंध विचार करण्याच्या प्रक्रियेशी आहे. बुद्धिमत्तेशी नाही. बऱ्याचदा या दोन्हींबाबत एकत्र गल्लत केली जाते.
तज्ज्ञांच्या मदतीने अतिशय सकारात्मक वर्तन थेरपी, प्रशिक्षण यातून हा त्रास कमी होऊ शकतो.
पालकांनी मात्र मुलांच्या या प्रश्नाचा स्वीकार आवश्यक आहे. मुलांचा त्यात दोष नसतो हे आधी मान्य केलं तर गोष्टी सोप्या होऊ शकतात.
