Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मला असं विचित्र का हाेतंय?’-असा प्रश्न वयात येणाऱ्या मुलाने विचारला तर काय उत्तर द्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2024 18:21 IST

Understanding boys Puberty: वयात येताना फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्याही शरीरात बदल होतात. मुलांना ते जाणवतात पण समजत नाही. पण या बदलांमुळे त्यांचा गोंधळ मात्र उडतो.

ठळक मुद्देमुलांना प्रश्न पडतात आपल्या शरीरात नक्की घडतेय काय?

-डॉ. वैशाली देशमुखमागच्या आठवड्यात शाळेत एका डॉक्टरांनी फक्त मुलींसाठी सत्र घेतलं होतं. मुलांनी त्यांना खूप खोदून खोदून विचारलं त्याविषयी. पण मुली काहीच सांगायला तयार नव्हत्या. आज तेच डॉक्टर मुलांशी बोलायला येणार होते म्हणे. झालं, मुलांची कुजबूज सुरू झाली. दुसऱ्या तासाला त्यांच्या इतिहासाच्या लाडक्या बाई वर्गात आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आला सगळा प्रकार. “काय रे, काय खुसफूस चालू आहे? डॉक्टरांच्या सत्रांविषयी का? तुम्हांला माहिती आहे का ते कशाविषयी बोलणार आहेत? तुम्ही मोठे होताय ना आता! मनात खूप सारे प्रश्न असतील त्याविषयी तुमच्या. पण लाजेमुळे त्याविषयी नीट बोललं जात नाही. हे डॉक्टर आपल्याला मोठं होण्याच्या प्रवासाविषयी शास्त्रीय माहिती देतील. तुम्हांला ज्या काही शंका असतील, त्या अगदी नीट विचारून घ्या त्यांना. बाईंचं बोलणं ऐकून मुलांना जरा धीर आला.

काय काय सांगितलं त्या डॉक्टरांनी?१. मुलांना माहीतच नव्हतं इतकं काहीकाही आपल्या शरीरात घडत आहे ते. काय काय जाणवत मात्र होतं. उंची ताडमाड वाढायला लागली होतीच, शिवाय काखेत-जांघेत केस यायला लागले होतेच, ओठांवर लव दिसायला लागली होती, काहींचे आवाज फुटले होते. चेहरा तेलकट होऊन पिंपल्स यायला लागल्या होत्या. मुलींशी बोलण्यातला सहजपणा गेला होता. उगीचच ऑकवर्ड होत होतं त्या आजूबाजूला असल्यावर.२. आणखी काही बदलांविषयी तर फारच लाज वाटत होती. दोन पायांच्या मधे असलेल्या बाह्य-जननेंद्रियांमध्ये बदल दिसायला लागले होते. नळीसारख्या लिंगाची लांबी आणि घेर वाढत होता. त्यामागची अंडाशयाची पिशवी आकारानं मोठी आणि गडद रंगाची व्हायला लागली होती. 

३. कुठल्यातरी विचारांनी, थोड्याशा उत्तेजनानं लिंग ताठर व्हायचं. लोकांना दिसेल की काय या विचारानं त्यांना ओशाळं व्हायचं. रात्रीच्या वेळी कधीकधी लिंगातून पांढरट द्राव बाहेर यायचा. ‘बाप रे, काही घोळ आहे का आपल्या अवयवांमधे?’ अशा शंकेनं हैराण व्हायला व्हायचं.४. सत्रानंतर यातल्या बऱ्याचशा गोष्टींचं स्पष्टीकरण मिळालं. पुरुष जननसंस्थेचं काम पुरूषबीज तयार करणं हे असतं. मेंदूतल्या ग्रंथींमधून पाझरणाऱ्या हॉर्मोन्सचा परिणाम ह्या जननेंद्रियांवर होतो. त्यामुळे त्यांच्यात हे बदल दिसतात. अंडाशयात टेस्टोस्टेरॉन तयार व्हायला लागतं. त्याचा परिणाम म्हणून शुक्राणु किंवा पुरूषबीजं (स्पर्म्स) तयार होतात. ते मधून मधून बाहेर टाकले जातात. तोच रात्री बाहेर येणार द्राव असतो. इतकी माहिती देईपर्यंत वेळ संपली. निदान मुलांना त्यांच्या मनातल्या कुणाला काहीच न विचारता येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तरी मिळाली!

(लेखिका बालरोगतज्ज्ञ असून किशोरवयीन मुलांविषयी त्यांचा विशेष अभ्यास आहे.)vrdesh06@gmail.com

 

टॅग्स :मुलांचं तारुण्यपालकत्वआरोग्यशिक्षणपरिवार