Sugar or jaggery : सगळ्याच पालकांना आपल्या बाळांची काळजी असते. त्यांची तब्येत चांगली ठेवण्यासाठी ते अनेक गोष्टी करत असतात. त्यांना भरपूर पोषण मिळावं असा त्यांचा प्रयत्न असतो, पण काही बाबतीत ते कन्फ्यूज असतात. म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडतो की, लहान मुलांसाठी गूळ चांगला की साखर? हा एक फारच कॉमन प्रश्न आहे, जो जवळपास सगळ्याच पालकांना पडत असावा. अशात या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर रवि मलिक यांनी दिलं आहे. तेच पाहुयात.
डॉ. रवी मलिक यांच्या मते, २ वर्षांखालील मुलांना साखर किंवा गूळ देऊ नये. तर २ वर्षांनंतर जर तुम्ही मुलाला साखर किंवा गूळ द्यायचाच असेल, तर त्याचे प्रमाण खूपच कमी ठेवावं.
साखर आणि गूळ यांच्या तुलनेत गूळ मुलांना देणं अधिक योग्य आहे, कारण गुळामध्ये साखरेसोबत काही आवश्यक मिनरल्स जसे की लोह आणि मॅग्नेशिअम असतात, जे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण सोबतच आपण गुळाचे साइड इफेक्ट्स सुद्धा जाणून घेऊया.
गुळाचे साइड इफेक्ट्स
गुळामध्ये शर्करेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तो मुलांना झटपट ऊर्जा देतो, पण त्यानंतर थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. जर मुलांनी गूळ खाल्ल्यानंतर ब्रश केला नाही, तर दातांवर डाग पडू शकतात आणि किड होण्याचा धोका वाढतो.
गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटदुखीची तक्रार होऊ शकते, कारण तो शरीरात उष्णता वाढवतो. खासकरून उन्हाळ्यात जास्त गूळ खाणं टाळलं पाहिजे, नाहीतर मुलं चिडचिडी होऊ शकतात. गूळाचे जास्त सेवन दीर्घकाळात इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी करू शकते आणि भविष्यात मधुमेहाचा धोका वाढवू शकतो.
साखरेचे साइड इफेक्ट्स
साखरेत कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे मुलांचं वजन वाढू शकतं आणि लठ्ठपणाचा धोका निर्माण होतो. साखरेमुळे मुलांच्या मनःस्थितीत बदल होऊ शकतात. ऊर्जा वाढल्यानंतर अचानक कमी होते, त्यामुळे मुलं थकलेली किंवा चिडचिडी होऊ शकतात. साखर दातांवर चिटकते आणि बॅक्टेरिया वाढवते, ज्यामुळे दात सडणे आणि किड होणे सामान्य आहे.
जास्त साखर खाल्ल्याने दीर्घकाळात हृदयाचे आरोग्य बिघडते. रक्तातील ट्रायग्लिसराइड्स आणि वाईट कोलेस्टेरॉल (LDL) वाढू शकतात. साखरेचा अतिरेक मुलांमध्ये मूड स्विंग्स, आक्रमकपणा आणि लक्ष केंद्रीत करण्यात अडचण निर्माण करू शकतो.
गूळ साखरेपेक्षा थोडा आरोग्यदायी असला तरी तोही मर्यादित प्रमाणातच द्यावा. २ वर्षांखालील मुलांना साखर आणि गूळ दोन्ही देणं टाळावं, आणि मोठ्या मुलांमध्ये त्याचं प्रमाण कमी ठेवणं आवश्यक आहे.
