डॉ. श्रुती पानसे
आधी मला गणित हा विषय आवडायचा. पण आता अजिबात आवडत नाही. कारण मी कधी पासच होत नाही!’ ‘गणिताचा सराव केला तरी आयत्या वेळेला कोणतं गणित येईल हे सांगता येत नाही. मग गडबड होते!’ ‘मला गणितं सोडवता येतात. पण माझ्या हातून चुकून ० च्या ऐवजी २० लिहिले जातात. किंवा गुणाकार करायचा असतो पण चुकून बेरीज केली जाते. सूत्रं चुकीची वापरली जातात. अशा चुका होतात.’ -अशी कितीतरी कारणं मुलं सांगतात. पालक त्यांच्यावर शिक्के मारतात की याला गणित अवघड जातं, गणितात डोकंच कमी आहे. गणिताची भीतीच घातली जाते.
असं का होतं?
१. गणित आवडत नाही याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. कारण त्यात जास्त मार्कस मिळत नाहीत. पण दुसरीकडे बघितलं तर एकदा गणित समजलं की त्यात पैकीच्यापैकी मार्क सुद्धा मिळू शकतात. शंभरपैकी शंभरसुद्धा मार्क गणितात पडतात.
२. जर असं असेल तर गणिताचा जास्त चांगला अभ्यास करता यायला हवा. त्यासाठी काही गोष्टी करता येतील.
३. गणिताचा अभ्यास रोज करायला हवा.
४. परीक्षेच्या अभ्यासाच्या काळात किमान दहा वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोडवायला हवीत.
(Image : google)
५. जी गणितं अजिबात येत नाहीत, ती बघून लिहून काढली तरी चालतील. पण त्यानंतर मात्र न बघता सोडवायला पाहिजेत.
६. प्रत्येक गणित दोन वेळा वाचलं की नीट समजेल. त्यानंतरच सोडवायला घ्यायचं. हे सरावांच्या वेळी लक्षात ठेवून करायचं म्हणजे परीक्षेत तीच सवय उपयोगी पडते.
७. अभ्यास करतानाही गणित सोडवून झालं की वाचायचं म्हणजे समजा तिथे काही चुका उगीचच झाल्या असतील तर त्या लगेच लक्षात येतील.
८. गणित म्हणजेच तर्क असतो. तर्क वापरून गणित समजून घेतलं की चुकण्याच्या शक्यता कमी होतात.
९. कोणतंही गणित हे सूत्रानुसार चालतं. कोणतं सूत्र कोणत्या गणिताला वापरायचं हे कळलं आणि पाठ्यपुस्तकातली सर्व सूत्रं लक्षात घेतली तर मार्क मिळतात
१०. भूमितीतल्या आकृत्या समजून घेतल्या की जमतात. किमान एकदा तरी त्या हातांखालून जायला हव्यात.
११. गणिताचा व्यावहारिक उपयोग समजून घेतला तर आपण गणित का शिकतो, याचं उत्तर मिळतं.
पालकांसाठी..
मुलांना नक्की कोणत्या इयत्तेपासून गणित अवघड जायला लागलं हे शोधायला हवं. जर आठवीत गणित अवघड जात असेल तर आठवीबरोबर सातवीत अवघड जात होतं की सहावीत की त्या आधी? हे शोधून त्या इयत्तेचीही गणितं सोडवायला हवीत. म्हणजे पुढच्या इयतांच्या गणिताचा पाया पक्का होईल. अशा प्रकारे गणिताचा अभ्यास समजून घेऊन केला तर मार्क नक्की मिळतील. मुळात गणिताची भीती घालून मुलांना अजूनच घाबरवून सोडू नये.
संचालक, अक्रोड
ishruti2@gmail.com