Join us

लहान वयातच मुलांना पोट सुटलंय, लठ्ठपणाची समस्या? डॉक्टर सांगतात, वेळीच काळजी करा, नाहीतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2023 09:25 IST

Reasons and remedies Behind belly fat in Children : लठ्ठपणामुळे मुलांच्या हालचालींवर मर्यादा येत असतील तर मात्र याबाबत पालकांनी वेळीच चिंता करण्याची आवश्यकता आहे

सुटलेली ढेरी किंवा पोट हे साधारण चाळीशीच्या नाहीतर पन्नाशीकडे झुकलेल्या व्यक्तीचे लक्षण. पण आजकाल अगदी तरुण किंवा लहान वयातील मुला-मुलींनाही ढेरी वाढल्याचे किंवा लठ्ठपणाने शरीरावर चरबी जमा झाल्याचे चित्र आपल्याला दिसते. मूल हेल्दी आहे म्हणून काहीवेळा या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. पण ही चरबी बरेच दिवस तशीच असेल आणि त्यामुळे मुलांच्या हालचालींवर मर्यादा येत असतील तर मात्र याबाबत पालकांनी वेळीच चिंता करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. डॉ. छाया शहा यांनी मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाबाबत नुकतीच काही महत्त्वाची माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली असून याकडे लक्ष द्यायला हवे (Reasons and remedies Behind belly fat in Children) . 

लटकणारे पोट असण्याची २ महत्त्वाची कारणं... 

मुलांच्या आहारात सॅच्युरेटेड फॅटस आणि मीठ, साखर यांसारख्या गोष्टींचा जास्त प्रमाणात समावेश असेल तर लठ्ठपणा किंवा चरबी वाढण्याचे ते एक महत्त्वाचे कारण असते. तसेच मुलांनी नियमितपणे जितक्या शारीरिक हालचाली करायला हव्यात तितक्या ते करत नसतील तरीही शरीरावर अशाप्रकारची चरबी जमा होते. त्यामुळे दिवसातून किमान १ तास मुलं सायकलिंग, रनिंग, स्विमिंग, डान्सिंग अशी काही ना काही शारीरिक हालचाल करतील असा प्रयत्न आवर्जून करायला हवा. तसेच आपल्याला वरुन दिसणाऱ्या या फॅटसचा त्यांच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होत असून त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरही या चरबीचा लहान वयातच वाईट परीणाम होतो. 

मुलांचा आहार आणि विहार याबाबत पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे. त्यांच्या आहारात आरोग्यासाठी उपयुक्त पोषक घटक असतील याचा प्रामुख्याने विचार करायला हवा. यामध्ये फळं, भाज्या, डेअरी उत्पादने, प्रोटीन भरपूर असणारा, द्रव पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश असलेला आहार असायला हवा. जंक फूड, शीत पेये यांपासून मुलांना शक्य तितके दूर ठेवायला हवे. तसेच खाताना मुलांना अजिबात स्क्रीन दाखवू नये कारण त्याचाही त्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत असतो हे लक्षात घ्यायला हवे. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंवेट लॉस टिप्सआरोग्य