Six Pocket Syndrom : आजकाल अनेक कुटुंबांमध्ये आई-वडील दोघेही जॉब करत असल्याने लहान मुले घरी आजोबा–आजी, मामा–मावशी किंवा नातेवाईकांच्या देखरेखीखाली असतात. अशा वातावरणात मुलांमध्ये काही विशिष्ट सवयी हळूहळू तयार होऊ लागतात. जेव्हा मुलाला सतत आराम, मदत आणि सर्व गोष्टी सहज मिळतात, तेव्हा मेहनत करण्याची इच्छा कमी होऊ शकते. लहानसहान कामही त्यांना अवघड वाटू लागतात आणि ते लगेच हारही मानतात. कारण त्यांना वाटतं की घरातील मोठे त्यांची प्रत्येक समस्या सोडवतीलच. हीच सवय पुढे शाळेत, मित्रांमध्ये आणि समाजात त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते.
सिक्स पॉकेट सिंड्रोम म्हणजे काय?
आजकाल मुलांमध्ये दिसणारी ही एक सामान्य पण महत्त्वाची समस्या आहे. सिक्स पॉकेट सिंड्रोम म्हणजे काय तर एक मूल आणि त्याला आधार देणारे घरातील ६ खिसे म्हणजेच ६ लोकांची आर्थिक व भावनिक मदत. जसे की आई, वडील, आजोबा, आजी, मामा/काका, मावशी/काकू इतक्या लोकांकडून प्रेम, काळजी, भेटवस्तू आणि आर्थिक पाठिंबा मिळाल्यामुळे मूल प्रत्येक मागणी तात्काळ पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवू लागतं
परिणाम : ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ ते ‘घमेंड’
जास्त लाड-कौतुकामुळे अनेक मुलांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स वाढू शकतो, जो हळूहळू घमेंडीत बदलतो. उदाहरणार्थ मुलाला एकच खेळणे हवे असते, पण घरातील प्रत्येक जण त्याला खुश करण्यासाठी वेगवेगळे तीन खेळणे आणतो. अशामुळे मुलाला ‘ना’ ऐकणं अवघड जातं. त्यामुळे त्यांच्यात हट्टीपणा, टँट्रम्स वाढतात. स्वतःला कायम बरोबर समजण्याची सवय लागते. इतरांचा आदर कमी होतो. अशा वर्तणुकीमुळे मूल उद्धट, आक्रमक किंवा अनियंत्रित होऊ शकते.
शिस्तीची गरज — प्रेमाची नाही, तर समतोलाची कमतरता
अनेक पालक हे बदल सुरुवातीला ओळखत नाहीत. पण काळ जसजसा जातो, मुलांची वाढती जिद्द, हट्टीपणा आणि वागणूक त्यांना त्रासदायक वाटू लागते. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, मुलांना शिस्तीत ठेवणे म्हणजे त्यांच्यावर कमी प्रेम करणे नाही. अत्याधिक लाडामुळे मुलांमध्ये अहंकार, जिद्दी स्वभाव, इतरांसमोर वागण्याची अडचण, सामाजिक कमकुवतपणा, भावनिक अस्थिरता यांसारख्या समस्या वाढू शकतात. मोठे झाल्यावर हेच गुण त्यांच्या नोकरीत, नात्यांत आणि समाजात अडथळे निर्माण करतात.
