Why Child Grinding their Teeth : आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर आपण पाहिलं असेल की, लहान मुलं झोपेत किंवा असंही कधीतरी दात खातात. अनेक पालकांना हेच वाटतं की, मुलं रात्री झोपेत दात खातात, म्हणजे त्यांच्या पोटात जंत झाले असतील. पण असं काही गरजेचं असेलच असं नाही. बालरोग तज्ज्ञ डॉ. तरूण आनंद यांनी याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ते सांगतात की, रात्री झोपेत लहान मुलं दात खात असतील तर त्या स्थितीला ब्रक्सिज्म असं म्हणतात. ब्रक्सिज्म एक अशी स्थिती आहे, ज्यात मुलं झोपेत नकळत असताना दात खातात.
दात खाण्याची ही समस्या प्रामुख्याने 3 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये दिसून येते. मात्र काही वेळा मोठ्या मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्येही ती आढळू शकते. ओरल हेल्थ फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, भारतात प्रत्येक 5 पैकी 1 मूल आयुष्यात कधीतरी ब्रक्सिझमसारख्या समस्येला सामोरं जातं.
रात्री झोपेत मुलांनी दात खाण्याची कारणं
नर्व्हस सिस्टिमचा विकास पुरेसा न होणे
लहान मुलांमध्ये झोपेत मेंदू आणि स्नायूंमधील समन्वय पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे झोपेत असताना जबडा घट्ट आवळला जातो आणि मुलं दात खाऊ लागतात. वय वाढत गेल्यावर ही समस्या बहुतेक वेळा आपोआप कमी होते.
दात येण्याची किंवा बदलण्याची प्रक्रिया
दुधाचे दात येत असताना किंवा दुधाचे दात पडून कायमचे दात येत असताना मुलांना थोडी अस्वस्थता जाणवते. यामुळेही मूल झोपेत दात खाऊ शकतात.
झोपेसंबंधी सवयी
काही मुलांची झोप खूप गाढ असते, तर काही मुलांची झोप मधेमधे तुटते. ज्यांची झोप सतत मोडते अशा मुलांमध्ये दात खाण्याची समस्या जास्त दिसते, कारण मूल भावनिकदृष्ट्या अस्थिर असू शकतं.
मानसिक ताण
लहान मुलांमध्ये ताण कमी असतो, पण शाळा सुरू होणे, घरात काही गोष्टींमध्ये बदल होणे किंवा आई-वडिलांमधील वाद यामुळे मुलाच्या मनावर परिणाम होतो. अशा वेळीही झोपेत दात खाण्याची सवय लागू शकते.
पोटातील जंत – एक गैरसमज
भारतात अनेकदा असं मानलं जातं की मूल झोपेत दात खात असेल तर त्याच्या पोटात जंत झाले असतील. पण डॉक्टरांच्या मते ही धारणा वैद्यकीयदृष्ट्या चुकीची आहे. दात खाणे आणि पोटातील जंत यांचा कोणताही थेट संबंध नाही.
मुलांनी रात्री दात खाणे नॉर्मल आहे का?
बालरोगतज्ज्ञ सांगतात की जर मूल रात्री झोपेत दात खात असेल, तर पालकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण लहान मुलांचे तंत्रिका तंत्र अजून पूर्ण विकसित झालेले नसते. जसजसं मूल मोठं होतं, तसतशी झोप अधिक शांत आणि खोल होते आणि दात खाण्याची समस्या बहुतांश वेळा आपोआपच दूर होते.
