Parenting Tips : लहान मुलं जेव्हा सहा महिन्यांचे होतात, तेव्हा त्यांना वरण, भात, पोळी, भाजी, सोजी अन्न खायला दिलं जातं. पण अनेकदा पाहिलं जातं की, एक ते दीड वर्षाची लहान मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात. जेवणाचं नाव निघालं तर ते तोंड वाकडं करतात. अशात लहान मुलांचे डॉक्टर मोहित सेठी यांनी मुलं असं का करतात याचं कारण सांगितलं आहे. डॉक्टर म्हणाले की, आई-वडिलांच्या काही चुकांमुळे लहान मुलं जेवण करण्यास नकार देतात. चला तर पाहुयात काय असते पालकांची चूक...
लहान मुलं जेवण का करत नाहीत?
डॉक्टर सांगतात की, लहान मुलं जेवणाचा कंटाळा करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आई-वडील त्यांना भूकेची जाणीवच होऊ देत नहीत. पालक मुलांना काहीना काही खाण्यासाठी दर दोन ते तीन तासांनी त्यांच्या मागे लागलेले असतात. जर मुलं जेवण करत नसतील तर त्यांना दिवसभर भरपूर दूध प्यायला दिलं जातं. त्यामुळे मुलांचं पोट दुधानेच भरलं जातं. अशात त्यांची जेवण करण्याची इच्छा होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी ते करण्यास नकार देतात.
काय कराल उपाय?
आपलं बाळ जर एक वर्षापेक्षा मोठं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेला एक सल्ला वापरू शकता. डॉक्टर म्हणाले की, आपल्याला केवळ 2 आठवडे ही ट्रिक करावी लागेल. चिमुकल्यांना जर दूध देत असाल तर त्याचं प्रमाण 300 ते 400 एमएल ठेवा. मुलांनी काही खाण्यास नकार दिला तर ते दूध मागतील. पण त्यांना दूध देऊ नका. त्यांना केवळ पाणी द्या. त्यांना जेव्हा भूकेची जाणीव होईल, तेव्हा ते आपोआप जेवण करतील.
डॉक्टरांनी सांगितलं की, दूध मिळालं नाही तर मुलं रडतील, हट्ट करतील आणि धिंगाणा घालतील. ते जेवण करण्यास नकार देतील. कारण दूध पिणं सोपं आहे आणि एक एक घास जेवण करणं त्यांच्यासाठी अवघड. पण आपणही अडून बसा. असं केवळ आपल्याला 2 ते 3 आठवडे करायचं आहे. त्यांना याची सवय लागेल. मग ते दूधही पितील आणि जेवणही करू लागतील.