Join us

तुम्हीही मुलांना टीव्ही, फोन दाखवत जेवण भरवता? पाहा, त्यानं मुलांच्या तब्येतीचं काय वाटोळं होतंय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:44 IST

पालक वेळ वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची मदत घेतात. मुलं मोबाईल पाहत असतानाच अन्न लवकर खातात.

आजकाल, धावपळीच्या जीवनामुळे आणि कामाच्या व्यस्ततेमुळे पालकांकडे आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ नाही. अशा परिस्थितीत पालक वेळ वाचवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची मदत घेतात. मुलं मोबाईल पाहत असतानाच अन्न लवकर खातात. कारण यामुळे त्यांचं मनोरंजन होत असतं. पालक देखील या गोष्टीने निश्चिंत होतात की मूल फोन किंवा टीव्ही पाहत असलं तरी जेवत आहे. पण तुमचा हा शॉर्टकट मुलाच्या आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकतो हे तुम्हाला माहिती आहे का?

टीव्ही किंवा मोबाईल पाहत मुलांना खायला देणं किती धोकादायक?

एन्व्हायर्नमेंटल जर्नल ऑफ हेल्थ नावाच्या मॅगझिनमध्ये मुलांच्या खाण्याच्या सवयींवरील एक रिसर्च प्रकाशित झाला होता. हा रिसर्च जगातील अनेक मोठ्या विद्यापीठांच्या सहकार्याने करण्यात आला. असं आढळून आलं की, टीव्ही किंवा मोबाईल पाहत जेवणारी मुलं भविष्यातही अन्नाबद्दल नखरे करतात. या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींवरूनही राग येतो. १० वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये लठ्ठपणाचा धोका अनेक पटींनी वाढतो जे टीव्ही किंवा मोबाईल पाहत खातात आणि ते लठ्ठपणाचे बळी ठरतात, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

WHO ने देखील दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलीकडेच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये, ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा स्क्रीन टाइम निश्चित करण्यात आला आहे. या मुलांच्या जास्त स्क्रीन टाइमचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. या रिपोर्टमध्ये WHO ने मुलांना मोबाईल, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जेवताना टीव्ही पाहण्याचे तोटे

- जेवताना टीव्ही पाहिल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होतात.

- टीव्ही पाहताना जेवल्याने संपूर्ण लक्ष टीव्ही किंवा फोनवर केंद्रित होतं, ज्यामुळे मुलं जास्त खातात.

- बहुतेक मुलांना टीव्ही पाहताना किंवा फोन वापरताना जंक फूड खायला आवडतं.

- रात्रीचे जेवण किंवा दुपारचं जेवण टीव्ही किंवा मोबाईल पाहत केल्याने मुलं खूप लवकर लठ्ठ होतात.

- टीव्ही किंवा फोन पाहत असताना मुलाला अन्न दिल्यास त्यांच्यामध्ये पोषणाची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यांना आवश्यक पोषक तत्वे मिळू शकत नाहीत.

-  ताण आणि चिंता वाढू शकते. जेवणाच्या वेळी त्यांना ताण येऊ शकतो.

- टीव्ही किंवा फोन पाहत जेवणारी मुलं सामाजिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतात. त्यांच्याकडे कौशल्याचा अभाव असू शकतो.

- मुलं टीव्ही किंवा मोबाईल पाहताना न बोलता अन्न खातात, ज्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या क्षमतेवर म्हणजेच संवादावर परिणाम होतो.

- डोळ्यांतून पाणी येणे, दृष्टी कमी होणे ही समस्या जाणवते.

- मुलांना मोबाईल पाहताना अन्न ओळखता येत नाही, ते समोर जे काही येतं ते नकळत खातात.

- मोबाईल आणि टीव्हीमध्ये हरवून जाण्यामुळे काही गोष्टी आठवत नाहीत.

-  मुलांना फोन आणि टीव्हीचं व्यसन लागू शकतं.

- टीव्ही किंवा फोन पाहत जेवणारी मुलं जास्त चिडचिडी, हट्टी आणि रागीट होतात. 

टॅग्स :पालकत्वअन्नहेल्थ टिप्सआरोग्य