Join us

बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:06 IST

पांढरे डाग दिसायला जरी लहान असले तरी ते शरीरात काहीतरी गडबड सुरू असल्याचे संकेत देतात.

काही मुलांच्या चेहऱ्यावर अचानक काही पांढरे डाग येऊ लागतात. त्यामुळे पालकांची चिंता खूप वाढते. हे पांढरे डाग दिसायला जरी लहान असले तरी ते शरीरात काहीतरी गडबड सुरू असल्याचे संकेत देतात. पण चेहऱ्यावर हे पांढरे डाग का दिसतात? यामागील मुख्य कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. अंकित अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मुलांच्या खाण्याच्या सवयींमध्ये केलेली एक साधी चूक त्यांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या डागांच्या स्वरूपात दिसून येते."

"दूध आणि मीठ हे कॉम्बिनेशन शरीरासाठी खूप हानिकारक आहे. जेव्हा जेव्हा मुलं खारट पदार्थ, स्नॅक्स, पराठे, दुधासोबत किंवा चहासोबत खातात तेव्हा त्याचा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. दुधासोबत खारट पदार्थांचं मिश्रण केल्याने पचन प्रक्रियेत समस्या निर्माण होतात, ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. या विषारी पदार्थांमुळे, केवळ पचनसंस्था कमकुवत होत नाही, तर त्वचेवर पांढरे डाग देखील दिसू लागतात. यामुळे ल्युकोडर्मा, एलर्जी आणि इतर समस्यांना देखील तोंड द्यावं लागू शकतं."

पांढरे डाग पडण्यामागील खरं कारण काय?

डॉ. अंकित यांच्या मते, त्वचेवर पांढरे डाग कधीकधी कमकुवत पचन आणि वाईट आहार सवयींमुळे देखील होऊ शकतात. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा पोषक तत्वे शरीरात योग्यरित्या शोषली जात नाहीत, ज्यामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसू लागतात. म्हणून मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे.

कसा असावा लहान मुलांचा आहार? 

लहान मुलांना दूध कधीही खारट, आंबट किंवा फॉर्म्युलेटेड पदार्थासोबत देऊ नये. त्याऐवजी मुलांना दुधासोबत ताजी फळं, काजू किंवा तूप असलेले पदार्थ देणं चांगलं आहे. यामुळे त्यांची पचनशक्ती मजबूत होतेच, तसेच त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.

खाण्याच्या सवयींचा होतो परिणाम 

खाण्याच्या वाईट सवयी केवळ त्वचेला कमकुवत करत नाहीत तर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत करतात. जेव्हा आतडं कमकुवत असतं तेव्हा शरीर अधिक संवेदनशील बनतं. डॉ. अंकित म्हणतात की, मुलांचे आतडं मजबूत ठेवणं त्यांच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 

पालकांनी काय करावं?

पालकांनी मुलांच्या आहारात योग्य कॉम्बिनेशन आहे की नाही याकडे नीट लक्ष दयावं. त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी. दुधासोबत कधीही खारट किंवा आंबट पदार्थ देऊ नका. मुलांच्या आहारात ताजी फळं, सुकामेवा आणि इतर निरोगी अन्नपदार्थांचा समावेश करा. याशिवाय मुलांची पचनशक्ती मजबूत करण्यासाठी त्यांना संतुलित आहार द्या. तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. 

टॅग्स :पालकत्वअन्नहेल्थ टिप्सआरोग्य