आमच्या वेळी हे असे डिप्रेशन, एग्झायटी सारखे प्रकार नव्हते , ही नवीन पिढीची थेरं आहेत. यांना प्रत्येक गोष्टीचाच ट्रॉमा होतो. ही वाक्ये तर तुम्हीही ऐकली असतीलच. भारतात आजही लोकांना मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि त्यासंबंधीत कोणताही आजार किंवा त्रास म्हणजे नाटक किंवा कमकुवत माणसाचे लक्षण वाटते. (Young women's video about depression goes viral, depression is not a joke, it is worst )विविध मानसिक स्थितीतून प्रत्येक जण जात असतो. मात्र त्याबद्दल मोकळेपणाने बोलणे किंवा व्यक्त होणे लोकांना जमत नाही. त्यामुळे सुधारु शकणारीही मानसिक स्थिती आणखी खालावते. आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण, व्यसनांचे वाढलेले प्रमाण सगळ्याच्याच दोऱ्या कुठे तरी या विषयाशी जोडल्या आहेत.
डिप्रेशन हा असा प्रकार आहे जो दिसत नाही. पटकन जाणवतही नाही, मात्र माणसाला आतून दुर्बळ करत जातो. मात्र आजकाल अनेक जण डिप्रेशनबद्दल जागरुकता निर्माण करताना दिसतात. लोकांना व्यक्त होण्याचा सल्ला देतात. जगप्रसिद्ध क्रिकेटपट्टू विराट कोहलीने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, मीही डिप्रेशनमधून गेलो आहे. एकटेपणा, खचलेले मन सारे ,सहन केले. त्याबद्दल व्यक्त होणे गरजेचे आहे. व्यक्त होणं म्हणजे कमकुवत नाही तर धैर्याचे लक्षण आहे. दीपिका पदूकोणही मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. तो जीवनाचा भाग आहे असा सल्ला सगळ्यांना देते. सध्या सोशल मिडियावर एका रशियन अभिनेत्रीचा डिप्रेशनबद्दलचा व्हिडिओ फार व्हायरल झाला आहे.
डिप्रेशन नक्की कसे असते. हे अगदी सोप्या संकल्पनेतून तिने समजावले. लोकांना जी बाजू दिसून येत नाही ती दाखवण्याचा प्रयत्न तिने केला. भारतात डिप्रेशनच्या आहारी जाणाऱ्या लोकांची संख्या ४.५ टक्के एवढी आहे. जी मुळात इतर देशांपेक्षाही जास्त आहे. तरीही त्यावर उपचार घेणे लोकांना पटत नाही. मानसिक त्रास म्हणजे वेडेपणाचे लक्षण मानले जाते. तसेच थेरेपी घेणे, मानसोपचारतज्ज्ञांशी बोलणे या गोष्टींना महत्व दिले जात नाही. थेरेपी घेणाऱ्यांनाही नावे ठेवली जातात. ही परिस्थिती बदलायला वेळ तर लागेल. त्यासाठी सरकारमार्फतही एक हेल्पलाइन कार्यरत आहे. टेली-मानस ही सरकारी तुकडी २४ तास मानसिक आधार देण्यासाठी कार्यरत असते. त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मनमोकळे करण्याची गरज प्रत्येकालाच असते.
डिप्रेशन वाढत गेले की त्यातून मात्र मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे खचते. शरीरावरही त्याचा परिणाम होतो. वेळीच योग्य उपचार घेणे गरजेचे असते. मानवी मेंदू अनेक टप्प्यांमध्ये एकाच वेळी कार्यरत असतो. स्वतःचे विचारही पूर्णपणे समजून घेणे अनेकदा कठीण असते. त्यामुळे अशावेळी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. ज्यामुळे मानसिक आधार आणि शांतता मिळते.