Hugging Benefits : आजच्या बिझी आणि धावपळीच्या जीवनात जास्तीत जास्त लोकांना तणाव-चिंतेचा सामना करावा लागतो. कामाचा वाढलेला ताण, वाढत्या जबाबदाऱ्या, भविष्याची चिंता यामुळे मानसिक थकवा खूप वाढला आहे. अशात लोक मानसिक शांतता मिळवण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी काहीना काही उपाय शोधत असतात. पण अनेकांना एक साधा आणि सोपा उपाय माहीत नसतो. तो म्हणजे आपल्या जोडीदाराला मिठी मारणे. एका प्रेमळ मिठीने नातं तर आणखी घट्ट होतंच, सोबतच मानसिक तणाव सुद्धा कमी होतो. आचार्य मनीषजी यांच्या मतेही, मिठी मारणं हृदय आणि मेंदू दोन्हीसाठीही फायदेशीर आहे.
पार्टनरला मिठी मारल्याने तणाव कसा कमी होतो?
जेव्हा आपण आपल्या पार्टनरला मिठी मारतो, तेव्हा शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होतो. याला लव्ह हार्मोन असंही म्हटलं जातं. हा हार्मोन तणाव वाढवणाऱ्या कॉर्टिसोल हार्मोनची लेव्हल कमी करतो. त्यामुळे मन शांत होतं आणि आपल्याला अधिक सुरक्षित व रिलॅक्स वाटतं. दिवसभराच्या धावपळीनंतर मारलेली एक मिठी शब्दांशिवायही खूप काही सांगून जाते.
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
मिठी मारणं फक्त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. यामुळे चिंता आणि नैराश्याची लक्षणं कमी होण्यास मदत होते. पार्टनरकडून मिळणाऱ्या आलिंगनामुळे 'आपण एकटे नाही' ही भावना निर्माण होते. हा भावनिक आधार आत्मविश्वास वाढवतो आणि नकारात्मक विचारांमधून बाहेर पडायला मदत करतो.
नात्यात वाढतं प्रेम, विश्वास आणि जवळीक
पार्टनरला मिठी मारल्याने नात्यातील जवळीक वाढते. प्रेम, आपुलकी आणि समज अधिक घट्ट होते. अनेक वेळा शब्द अपुरे पडतात, तेव्हा एक हग मनातील भावना व्यक्त करून जातो. नियमितपणे मिठी मारल्यास परस्पर विश्वास वाढतो आणि लहान-मोठे गैरसमज सहज दूर होतात.
आरोग्यावर सकारात्मक परिणाम
संशोधनानुसार, मिठी मारल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. तसेच, यामुळे इम्युन सिस्टीम मजबूत होते. शरीर अधिक रिलॅक्स झाल्याने झोपेची गुणवत्ता देखील चांगली होते.
दिवसात किती वेळ मिठी मारावी?
तज्ज्ञांच्या मते, किमान 20 सेकंदांची मिठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा दिवसाच्या शेवटी ही सवय लावा. हा छोटासा बदल तुमच्या जीवनशैलीत आणि नातेसंबंधांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवू शकतो.
