Join us
Daily Top 2Weekly Top 5

औषध नाही तर स्वरांची जादू! प्रचंड तणावाखाली असाल तर शास्त्रीय संगीताचे 'हे' राग ठरतील संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 11:34 IST

Music Therapy: राग, चिडचिड आणि थकवा पळवून लावण्यासाठी औषध घेत असाल तर एकदा या म्युझिक थेरिपीचा वापर करून बघा, फरक लगेच जाणवेल!

सद्यस्थितीत आपण शांत कधी बसलो होतो हे आठवावे लागेल. काम संपवून बसलो तरी हातात खेळणं असतंच. हो! मोबाईल रुपी खेळणं! ज्यामुळे बाहेरून शांत दिसत असलो तर त्यात दिसणारे, ऐकू येणारे कंटेंट आपल्या मनाला, विचारांना धावते ठेवतात. त्यामुळे हवी असलेली शांतता मिळतच नाही. पण मन थकतं. शांतता शोधत असतं. पडून राहावं तर कामाचा डोंगर दिसतो, डोळे मिटावे तर विचारांचं काहूर शांत बसू देत नाही. अशा वेळी आवडती गाणीसुद्धा मन रिझवत नाहीत. तेव्हा कधीतरी शास्त्रीय संगीत ऐकून बघा! हो...तुम्हाला आवड नसली तरी, त्याची जाण नसली तरी, ते जादुई सूर तुम्हाला अपेक्षित असलेली शांतता देतील हे नक्की. प्रयोग करून बघा. कसा ते जाणून घ्या. 

कधी कधी शब्द अपुरे पडतात, तिथे स्वर काम करतात. शास्त्रीय संगीत आपल्या मनावर खोलवर परिणाम करणारे एक 'नादशास्त्र' आहे. तुम्हाला रागांतील तांत्रिक गोष्टी समजत नसतील तरीही, त्यातील स्वरांचे कंपन तुमच्या मूडवर सकारात्मक परिणाम करते. तुमच्या मनाच्या विविध अवस्थांनुसार कोणते राग ऐकावेत ते जाणून घेऊ. 

भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाचा एक ठराविक वेळ आणि स्वभाव असतो. जर तुम्हाला गाण्यातील शब्द नको असतील, तर तुम्ही या रागांची इन्स्ट्रुमेंटल (बासरी, सतार किंवा संतूर) आवृत्ती ऐकू शकता.

१. प्रचंड मानसिक ताण आणि अस्वस्थता असेल तर...

जर कामाचा ताण जास्त असेल किंवा मन विनाकारण अस्वस्थ असेल, तर 'राग यमन' ऐका. हा अत्यंत संथ आणि मधुर राग आहे. रात्रीच्या वेळी हा राग ऐकल्याने मनातील कोलाहल थांबतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

शिफारस: उस्ताद बिस्मिल्ला खान यांची सनई किंवा हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी.

२. नैराश्य किंवा उदास वाटत असेल तर...

मनात उत्साह कमी वाटत असेल, तर 'राग अहिर भैरव' हा उत्तम पर्याय आहे. पहाटेच्या वेळी हा राग ऐकल्याने मनातील मरगळ दूर होऊन एक नवीन ऊर्जा मिळते. यातील कोमल रिषभ मनाला उभारी देतो.

शिफारस: पं. शिवकुमार शर्मा यांचे संतूर वादन.

३. राग किंवा चिडचिड शांत करण्यासाठी...

जर तुम्हाला खूप राग येत असेल किंवा डोके शांत ठेवायचे असेल, तर 'राग दरबारी कानडा' ऐका. हा राग अतिशय गंभीर आणि खोल आहे. या रागातील स्वरांचे वजन तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते.

शिफारस: उस्ताद विलायत खान यांची सतार.

४. मन एकाग्र करायचे असेल तर...

अभ्यास करताना किंवा कोणतेही महत्त्वाचे काम करताना एकाग्रता हवी असेल, तर 'राग हंसध्वनी' निवडा. हा राग अतिशय प्रसन्न आणि चैतन्यदायी आहे. यातील स्वर तुम्हाला 'फोकस' राहण्यास मदत करतात.

शिफारस: पं. विश्वमोहन भट्ट यांचे गिटार वादन.

५. मनाला शुद्ध आणि पवित्र वाटण्यासाठी...

भक्तीभाव किंवा आध्यात्मिक शांतता हवी असेल, तर 'राग भैरवी' हा सर्वोत्तम आहे. कोणत्याही मैफिलीस पूर्णत्व देणारा हा राग मनातील सर्व विकार दूर करून एक वेगळीच तृप्ती देतो.

प्रयोग करून पहा:

आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त १० मिनिटे डोळे मिटून कोणत्याही एका रागाचे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐका. तुम्हाला शब्दांची गरज भासणार नाही, केवळ त्या स्वरांच्या लहरी तुमच्या मेंदूला शांत करतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Classical Music: A Soothing Remedy for Stress and Anxiety

Web Summary : Feeling stressed? Classical music's 'Naadashastra' can deeply impact your mood. Different Ragas like Yaman for stress, Ahir Bhairav for depression, Darbari Kanada for anger, Hansdhwani for focus, and Bhairavi for peace offer unique benefits. Instrumental versions amplify calming effects, promoting tranquility and well-being.
टॅग्स :मानसिक आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्ससंगीत