Happy Hormone : कामाचा वाढलेला ताण, घरातील वाढलेल्या जबाबदाऱ्या, नात्यांमधील समस्या, मुलांचा सांभाळा, आर्थिक भार यामुळे सगळ्याच लोकांचा तणाव खूप जास्त वाढला आहे. खासकरून महिलांवर हा तणाव अधिक बघायला मिळतो. कारण त्यांना घरासोबतच नोकरी सुद्धा सांभाळायची असते. अशात अनेकदा कोणत्याही कारणांशिवाय मन उदास वाटतं किंवा थकवा जाणवतो. याचा परिणाम आपल्या कामावर आणि मनावर होतो. जर आपल्याला सुद्धा नेहमी असं वाटत असेल की, आपण सतत तणावात आहात, तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
इथे आपण काही सोप्या गोष्टी सांगत आहोत, ज्या केवळ तणाव आणि थकवा दूर करण्यास मदत करत नाहीत, तर आपला मूड चांगला ठेवतात आणि एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करतात. प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स शरीरातील ‘हॅपी हार्मोन’ वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतील.
तणावमुक्त आणि आनंदी राहण्यासाठी काय करावे?
सकाळी उन्ह घ्या
दररोज सकाळी किमान 15-20 मिनिटे सूर्यप्रकाशात वेळ घालवा. त्यामुळे शरीरात सेरोटोनिन (Serotonin) नावाचा ‘हॅपी हार्मोन’ वाढतो. सूर्यनमस्कार करणे हे केवळ योग नाही, तर सायन्सनुसारही फायदेशीर ठरतं.
पुरेशी आणि चांगली झोप
जे लोक उशिरा झोपतात किंवा पुरेशी नीट झोप घेत नाहीत, त्यांच्या शरीरात सेराटोनिनचे म्हणजे तणाव वाढवणाऱ्या हार्मोनचं प्रमाण कमी होते. त्यामुळे रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. झोप चांगली झाली तर मनही प्रसन्न राहतं.
संतुलित आणि पौष्टिक आहार
दही, दूध, डाळी, ड्राय फ्रूट्स आणि बिया यामध्ये ट्रिप्टोफॅन असतो, जो सेराटोनिन वाढवण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे इडली, डोसा आणि घरचे लोणचे यांसारखे फर्मेंटेड फूड्स खा. हे अन्न पचनसंस्थेतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात, ज्यामुळे मन हलकं आणि आनंदी राहतं.
निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा
दररोज थोडा वेळ झाडांजवळ किंवा बागेत घालवा. अनवानी गवतावर फिरा, आवडणारं शांत संगीत ऐका. त्यामुळे मेंदू शांत होतो आणि मूड फ्रेश राहतो.
योगगुरू हंसा योगेंद्र यांच्यानुसार, "खरा आनंद बाहेरून मिळत नाही, तो आपल्या आतून निर्माण होतो." जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होतो, योग्य रूटीन पाळतो, तेव्हा मन आपोआप शांत, आनंदी आणि प्रसन्न राहतं. म्हणून आजपासूनच या ४ सवयी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवा आणि नैसर्गिकरित्या फील-गुड हार्मोन्स वाढवा.