सायली कुलकर्णी (मानसोपचारतज्ज्ञ)
“मॅडम, मला ADHD आहे.” २१ वर्षांचा अक्षय माझ्यासमोर बसताच अगदी ठामपणे म्हणाला. मी शांतपणे विचारलं, “तुला असं का वाटतं?’ तो म्हणाला, “मी सहा महिने रिसर्च करतोय. इंटरनेटवर अनेक लेख वाचले, व्हिडीओ पाहिले, सेल्फ-असेसमेंट टेस्ट्स सोडवल्या. सगळी लक्षणं मला लागू पडतात.”
असं म्हणत एकेक करून अक्षय आपली लक्षणं सांगू लागला. “कामात लक्ष लागत नाही, काम पुढे ढकलतो, चिडचिड होते, मन सतत भरकटतं…”
त्याला बरंच बोलतं केल्यावर समजलं की त्याच्या अडचणींचं मूळ ADHD नव्हतं, तर सततची तुलना-दबाव, अपयशाची भीती आणि स्वतःबद्दलचा न्यूनगंड हे होतं. योग्य उपचार झाल्यानंतर तो बरा झाला.
पण अक्षय हा अपवाद नाही. हल्ली अनेक तरुण, तरुणी, पालक, प्रौढ स्वतःच मानसिक आजाराचं नाव ठरवून माझ्यासारख्या सायकॉलॉजिस्टकडे येतात. त्यांनी त्यांचं निदान स्वत:च केलेलं असतं. स्वतःवर वेगवेगळे प्रयोग केलेले असतात. हे सगळं करण्यात महिनोन्महिन्यांचा वेळही घालवलेला असतो.
स्वनिदान अर्थात सेल्फ डायग्नोसिस हा एक गंभीर प्रकार आहे.
त्यातही आता इंटरनेट, सर्च इंजिन्स, सोशल मीडिया, व्हिडीओ, चेकलिस्ट आणि एआय यामुळे आपल्या एखाद्या मानसिक अवस्थेला गंभीर आजाराचं लेबल लावलं जातं. थोडी अस्वस्थता जाणवली की, “मला एन्झायटी आहे.” उदास वाटलं की, “मला डिप्रेशनच आहे.” लक्ष लागत नाही की “ ADHD आहे.” असं ठरवून अनेकजण काळजीत पडतात.
माहिती सहज उपलब्ध असणं ही चांगली गोष्ट आहे. पण माहिती मिळणं आणि अचूक निदान होणं, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
त्यानं होतं काय?
खरी समस्या दुर्लक्षित राहते. स्वत:ला एक लेबल लावून टाकते. चुकीचे प्रयोग स्वत:वर करते. योग्य मदत लवकर मिळत नाही. मानसिकदृष्ट्या व्यक्ती खूप थकते. कारण अयोग्य आणि अकारण केलेले मानसिक श्रम ताण वाढवतात. ओव्हरथिंकिंग सुरू होतं. मन पुरतं गोंधळून गेल्यानं तणाव कमी होण्याऐवजी वाढत जातो. जसं स्वतःचा ताप मोजून त्यावर उपचार करणं धोकादायक ठरू शकतं, तितकंच मानसिक लक्षणांवर स्वत:च काहीबाही उपचार करणंही धोक्याचं ठरतं. स्वनिदान केल्यानं प्रश्न सुटत नाहीत. ते अधिक गुंतागुंतीचे होतात.
करायचं काय?
प्राथमिक मानसोपचार म्हणून काही गोष्टी करता येतील.
१. आपल्या भावना नाव न देता फक्त लिहून काढा.
२. झोप, भूक, स्क्रीन टाइम याकडे लक्ष द्या.
३. विश्वासू व्यक्तीशी मोकळेपणाने बोला.
४. “मला काय जाणवतंय?” असा प्रश्न स्वतःला विचारा.
५. त्रास सातत्याने होत असेल, अभ्यास, काम, नातेसंबंध यावर परिणाम होत असेल, स्ट्रेस वाढला असेल तर लवकर तज्ज्ञांकडे जा.
६. उशीर होण्यापूर्वी योग्य मदत घ्या, मला सगळं माहिती आहे म्हणत एआयवर विसंबून प्रयोग करू नका.
