सायली कुलकर्णी (समुपदेशक)
अमोघ, वय ७ वर्षे, दुसरीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा मुलगा. सतत चुळबुळ करणे, अभ्यासात लक्ष न लागणे, शिक्षकांच्या सूचना न ऐकणे, इतर मुलांशी भांडण करणे या आणि अशा अनेक तक्रारी असणारा अमोघ आईसोबत क्लिनिकमध्ये कौन्सिलिंगसाठी आला. अमोघची आई सांगत होती, “तो घरात शांत बसतच नाही. अभ्यासासाठी बसवले की, त्याचे लक्ष लगेचच विचलित होते. तो गृहपाठ पूर्ण करत नाही, सतत काहीतरी उद्योग करत असतो. त्याला इतकी एनर्जी कुठून येते हे समजतच नाही. भरीस भर म्हणून मित्रांसोबत खेळताना सतत भांडणं, मारामारी यांनी तर नको-नको झालंय.”
क्लिनिकमध्ये अगदी पहिल्या काही मिनिटांमध्येच निरीक्षणातून मला ‘हायपर ॲक्टिव्हिटीची’ अनेक लक्षणे अमोघमध्ये मला दिसून आली. त्याची सामान्य मुलांपेक्षा असलेली जास्त हालचाल, त्याचं खुर्चीवर बसता-बसता सारखं उठणं, पाय हलवत राहणे, गडबडीने चालणं, धावणं, एकंदरीतच असलेली अधिक गती आणि उत्साह, मध्ये-मध्ये केली जाणारी सततची बडबड. पूर्णपणे सूचना न ऐकताच, विचार न करता ताबडतोब कृती करायची गडबड.
इतका लहान मुलगा त्यामुळे घाईने निष्कर्षापर्यंत न जाता मी अमोघच्या केसबाबतही DSM-5 च्या निकषांनुसार काही चाचण्या करा, असे सुचवले. ADHD डायग्नोस्टिक क्रायटेरियाअंतर्गत बुद्धिमत्ता आणि लक्ष क्षमता तपासण्यासाठी त्याला चाचण्या देण्यात आल्या. अर्थातच अपेक्षेप्रमाणे याही चाचण्यांच्या निकालानुसार अमोघला ADHD (अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टिविटी डिसऑर्डर) असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
अमोघची केस सविस्तर स्पष्ट करून सांगण्याचा हेतू हाच की, केवळ अमोघच नव्हे, तर त्याच्यासारखी अनेक मुलं ADHD ने त्रस्त असल्याचे दिसून येते. अशा मुलांच्या पालकांना, शिक्षकांना या मुलांच्या बाबतीत नेमकं काय करता येईल हे समजतच नाही. अशी मुलं बरेचदा शाळेमध्ये त्रासदायक, वर्गामध्ये डिस्टर्बन्स निर्माण करणारी, घरामध्ये आवरायला अवघड आणि समवयस्क/ मित्रमैत्रिणींमध्ये बाजूला काढली गेलेली असल्याचे दिसून येते. अशा मुलांच्या भावना, एकटेपणा, मानसिक सल यांचा विचार कोण करणार? सतत नाकारलं आणि झिडकारलं गेल्यामुळे अगतिक झालेल्या त्यांच्या स्व-संकल्पनेचं काय? याचा विचार कोण करणार?
आज जगभरात अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरचे (ADHD) प्रमाण वाढत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, २०२२ मध्ये जागतिक स्तरावर ५ टक्के मुलांमध्ये ADHD निदान झाले आहे. भारतामध्ये, 2023 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, ६ ते १२ वयोगटातील मुलांमध्ये ADHD चे प्रमाण ७.१% आहे. आज भारतात अनेक शाळांपुढे ADHD मुलांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ‘आ’वासून उभा आहे. आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यासंदर्भात कोणतेही ठोस प्रणाली नाही.
मात्र, केवळ ADHD चे लेबल लावून सोडून देणे. हा मुळीच यावरचा उपाय नाही तर, ही एक सोयिस्कर शोधलेली पळवाट आहे. लवकर निदान व योग्य उपचारांद्वारे त्याची लक्षणे नियंत्रित करून ADHD व्यक्तींचे जीवन सुधारता येते.
गैरसमज काय आहेत?
१. हा आजार म्हणजे केवळ आळशीपणा असे काहींना वाटते.
२. पालकत्वातील अपयश. ते पालकांच्या चुकीच्या संगोपनामुळे होते.
३. ही एक काल्पनिक समस्या आहे.
४. हा केवळ मुलांमध्येच आढळतो.
५. औषधोपचार घेतल्याने पूर्णपणे बरा होतो.
ADHD असेल तर होतं काय?
१. गैरसमज, संवादाचा अभाव, चिडचिड यामुळे वैयक्तिक नातेसंबंध बिघडलेले असतात.
२. अनेक अभ्यासांतून असे लक्षात आले आहे की, ADHD असलेली मुले ही चुकीच्या मार्गावर जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वर्तन आढळून येते.
३. लहानपणी योग्य उपचार न झाल्यास, किशोरवयीन किंवा प्रौढावस्थेत नैराश्य, चिंता, आत्मविश्वास कमी होणे आणि आत्मसन्मान कमी होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. टोकाच्या भावनिक समस्या असल्याचे दिसून येते.
४. नियम तोडणे, चिडचिड, आक्रमक वागणूक आणि अतिजोखमीचे वर्तन अशा वर्तन समस्या दिसून येतात.
५. करिअरमध्ये अडथळे निर्माण झाल्याचे दिसून येते. जसे की, कामात सातत्य न ठेवता येणे, नोकरीची धरसोड, वेळेचे नियोजन न करता येणे. जबाबदाऱ्या पेलणे कठीण होणे, ज्यामुळे रोजगार टिकवणे अवघड होणे.
६. निद्रानाश, अस्वस्थता आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैलीमुळे आरोग्याचे इतर प्रश्न निर्माण होताना दिसतात.
काय करता येईल?
१. मानसशास्त्रीय समुपदेशन हा व्यवस्थापनातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा.
२. वर्तनिक उपचारपद्धती आवश्यक. यात काही तंत्रं शिकवतात. वर्तनोपचाराद्वारे स्व-नियंत्रण शिकविले जाते व चांगल्या वर्तनासाठी प्रोत्साहन दिले.
३. पालकांची भूमिका महत्त्वाचे असते. पालकांना मुलासाठी शिस्तबद्ध दिनक्रम, ठराविक वेळापत्रक तयार करण्यासाठी समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन करण्यात येते.
४. शिक्षकांना या मुलांशी कसे योग्य वर्तन मार्गदर्शन करायचे हे शिकवले जाते.
५. ज्या वेळेस लक्षणे खूपच तीव्र होती, त्यावेळी डॉक्टर अल्प मात्रेत औषधे देतात.
६. जितक्या लवकर निदान व योग्य उपचार तितक्या लवकर ADHD असलेल्या मुलांचं जगणं आनंदादायी, समृद्ध होऊ शकतं.