दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये क्लासिक स्लॅलममध्ये सुवर्णपदक जिंकून पुण्यातील श्रेयसी जोशीने इतिहास रचला आहे. श्रेयसीने इनलाइन फ्रीस्टाइल - क्लासिक स्लॅलम प्रकारात अव्वल स्थान पटकावलं आणि या प्रतिष्ठित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.
आशियातील सर्वोत्तम स्केटर सहभागी झालेल्या या स्पर्धेत श्रेयसीची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट होती. तिचं कौशल्य, आत्मविश्वास आणि समर्पण यामुळे तिला मोठं यश मिळालं आणि तिने भारताचं नाव उंचावलं. तिच्या या कामगिरीचा सर्वांनाच अभिमान वाटत आहे. देशभरात, विशेषतः पुण्यात आनंद साजरा केला जात आहे.
श्रेयसी जोशी ही पुण्याची रहिवासी आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू), बी.टेक कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (सीएसई) च्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.
श्रेयसीने आतापर्यंत १० हून अधिक राष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. तिची धाकटी बहीण स्वराली देखील स्केटिंग करते आणि तिने नऊपेक्षा जास्त राष्ट्रीय पदकं जिंकली आहेत. दोन्ही बहिणींनी वयाच्या तिसऱ्या वर्षी स्केटिंग सुरू केलं आणि वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी पहिलं राष्ट्रीय पदक जिंकलं.
श्रेयसीने वयाच्या १२ व्या वर्षी चीनमध्ये झालेल्या जागतिक रोलर गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाऊल ठेवलं. तेव्हापासून तिने सातत्याने आपलं टॅलेंट दाखवलं आहे आणि चुंचिओन, मिलान आणि सेनिगालिया येथे झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत. तिच्या समर्पणामुळे आणि कौशल्यामुळे ती या खेळात जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
एका मुलाखतीत श्रेयसीने स्केटिंगमध्ये तिला कशी आवड निर्माण झाली ते सांगितलं. "मी लहान असताना माझे पालक मला मैदानावर घेऊन जायचे. शेजारच्या मैदानात काही मुलं स्केटिंग करत होती. मला ते पाहणं खूप आवडायचं आणि मी माझ्या पालकांना सांगितलं की, मलाही स्केटिंग करायचं आहे. अशा प्रकारे मी सुरुवात केली." श्रेयसीपासून भारतातील अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे.