Join us

Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:35 IST

Sonajharia Minz : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कॉम्पूटर सायन्स विभागाच्या प्रोफेसर डॉ. सोनाझरिया मिंज यांनी असंख्य आव्हानांना तोंड देत इतिहास रचला आहे. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कॉम्पूटर सायन्स विभागाच्या प्रोफेसर डॉ. सोनाझरिया मिंज यांनी असंख्य आव्हानांना तोंड देत इतिहास रचला आहे. शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. तसेच जागतिक व्यासपीठावर आदिवासी समुदायांचे अधिकार, हक्क, ज्ञान प्रणाली आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोच्या सह-अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

भारतातील ओरांव आदिवासी समुदायातील डॉ. सोनाझरिया मिंज आणि कॅनडाच्या निस्गा नेशनमधील डॉ. एमी पॅरेंट पुढील ४ वर्षांसाठी युनेस्कोच्या परिवर्तनीय ज्ञान संशोधन प्रशासन आणि पुनर्वसन अध्यक्षपदाचे संयुक्तपणे नेतृत्व करतील. सोनाझरिया या भारतातील पहिल्या आदिवासी आहेत ज्यांनी हे प्रतिष्ठित पद मिळवलं आहे. युनेस्को १९८९ पासून अशा नियुक्त्या करत आहे आणि आतापर्यंत १०६१ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे, परंतु आतापर्यंत भारतातील कोणत्याही आदिवासी व्यक्तीचा समावेश नव्हता.

पहिल्या आदिवासी महिला कुलगुरू होण्याचा विक्रम

डॉ. सोनाझरिया मिंज यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक आव्हानांवर मात करून त्या आज येथे पोहोचल्या आहेत. २०२० मध्ये जेव्हा त्या सिदो कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या कुलगुरू झाल्या, तेव्हा डॉ. मिंज यांनी भारतातील विद्यापीठाच्या पहिल्या आदिवासी महिला कुलगुरू होण्याचा विक्रमही केला. डिसेंबर १९६२ मध्ये झारखंडच्या गुमला जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. आदिवासी असल्यामुळे त्या पाच वर्षांच्या असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला.

 

"आदिवासी असल्याने शाळेत प्रवेश दिला नाही"

"मी फक्त पाच वर्षांची होते, पण मला समजलं की मी आदिवासी असल्याने मला त्या शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. मला भेदभाव समजतो की नाही हे मला माहित नाही, पण मला वंचितपणा समजला. मला माहित होतं की, मी आदिवासी असल्याने मला कशापासून तरी वंचित ठेवण्यात आलं होतं. मी अशा सामाजिक क्षेत्रातील आहे जिथे भविष्यातही भेदभावाचा सामना करावा लागू शकतो. मी निराश झाले, म्हणून मी त्यांना चुकीचं सिद्ध करण्याचा संकल्प केला."

"मी मोठी झाल्यावर गणिताची शिक्षिका होईन"

"मी गणितात चांगली होते, म्हणून मी लगेच ठरवलं की मी मोठी झाल्यावर गणिताची शिक्षिका होईन. जेव्हा मी शाळेत गेली तेव्हा मला भाषेबाबत खूप समस्या होत्या आणि काही विषय खूप त्रास देत होते. दुसरीकडे, गणित सोपं होतं. त्यासाठी मला हिंदी भाषा येत असण्याची गरज नव्हती, म्हणून मला ते खूप आवडलं आणि मी त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निर्णय घेतला" असं डॉ. सोनाझरिया मिंज यांनी म्हटलं आहे. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीशिक्षणशाळा