गोरखपूरच्या शिक्षिका दिव्या सिंह यांनी १७,५६० फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सायकलने पोहोचून अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. असा विक्रम करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या आणि जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. दिव्या यांनी हा पराक्रम २४ मार्च रोजी केला. ज्या वेळी त्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्या, तेव्हा तेथील तापमान -१२ अंश सेल्सिअस होतं. ३१ मार्च रोजी त्या आपल्या गावी परतल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
गोरखपूरमधील पिपरौली ब्लॉकच्या अमरौटा (बनौडा) येथील रहिवासी संतराज सिंह आणि उर्मिला सिंह यांची २८ वर्षीय कन्या दिव्या सिंह या व्यवसायाने शिक्षिका आहेत. त्यांना सायकलिंग आणि ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. २४ मार्च रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर (१७,५६० फूट) सायकलने पोहोचून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. अशी कामगिरी करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या आहेत.
काठमांडूपासून सायकल प्रवासाला सुरुवात
दिव्या सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या या सायकल मोहिमेची सुरुवात १६ मार्च रोजी काठमांडू येथून झाली. या प्रवासात त्यांनी काठमांडू, सलेरी, सुरखे, फॉकडिंग, सागरमाथा नॅशनल पार्क, नामचे बाजार, डीबोचे, फिरचे, लोबुचे आणि गोरखशेप असा मार्ग पार करत माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना एकूण १४ दिवस लागले. या मोहिमेत त्यांना अनेक कठीण आव्हानांचा सामना करावा लागला.
"हवामान अत्यंत खराब"
दिव्या म्हणाल्या की, "तेथील हवामान अत्यंत खराब होतं. दररोज बर्फवृष्टी आणि पाऊस होत असे, कधीकधी तर हे असं दिवसभर चालायचा. त्यासोबतच दिवसभर वेगवान गार वारे वाहत असत. दिवसादेखील तापमान शून्याच्या खाली (मायनसमध्ये) असायचं. हा प्रवास जितका सुंदर होता, तितकाच आव्हानात्मकही होता."
ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
खांद्यावर सायकल घेऊन करावा लागला प्रवास
एव्हरेस्ट बेस कॅम्पचा चढणीचा रस्ता इतका कठीण होता की, दररोज अर्ध्याहून अधिक वेळ सायकल खांद्यावर उचलून चालावं लागत असे. हिमनद्या (ग्लेशियर), हवेतील ऑक्सिजनची कमतरता, उंची, थंडी, थकवा आणि वेदना या सर्वांचा सामना एकाच वेळी करावा लागत होता. ऑक्सिजन कमी असल्याने आणि हृदयाचे ठोके प्रति मिनिट १२० पर्यंत पोहोचल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असे. दररोज सुमारे १० ते १२ तास सायकलिंग करावं लागत असे. दिव्या सिंह यांनी ही सायकल मोहीम मार्गदर्शक व प्रशिक्षक आणि 'रस्ट ॲडव्हेंचर कंपनी'चे एमडी उमा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण केली.
