उत्तर प्रदेशच्या बारबंकी जिल्ह्यातील सिरौलीगौसपूर तहसील अंतर्गत येणाऱ्या अगेहरा गावातील विद्यार्थिनी पूजा आज लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा बनली आहे. छोट्याशा घरात राहणारी पूजा तिच्या प्रयोगांमुळे आणि विज्ञानातील आवडीमुळे थेट जपानला पोहोचली आणि तिथे भारताचं प्रतिनिधित्व करून परतली. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या या मुलीच्या घरात अजूनही वीज आणि शौचालयही नाही.
पूजाची यशोगाथा जितकी प्रेरणादायी आहे तितकीच तिच्या कुटुंबाची परिस्थिती चिंताजनक आहे. पूजाचे वडील पुट्टीलाल मजूर आहेत आणि आई सुनीला देवी सरकारी शाळेत काम करते. पक्क घरंही नाही. पूजा तिच्या पाच भावंडांसह या घरात राहते. दिव्याच्या प्रकाशात ती अभ्यास करते. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन आणि शौचालय मंजूर केलं आहे, वीज मीटरही घरात पोहोचला आहे, पण खांबापासून घरापर्यंत केबल खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. आर्थिक परिस्थिती इतकी कमकुवत आहे की पूजाचे पालक ते खरेदी करू शकले नाहीत. त्यामुळे घरात वीज अद्याप येऊ शकलेली नाही.
पूजा अभ्यासासोबतच घरातील जबाबदाऱ्याही घेते. घरातील सर्व काम करते, परंतु तिने कधीही हार मानली नाही. पूजाने आठवीमध्ये शिकत असताना विज्ञान मॉडेल बनवले - धूळमुक्त थ्रेशर मशीन, तेव्हा ती पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली. शाळेजवळील थ्रेशर मशीनमधून उडणाऱ्या धुळीमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या, ज्यापासून प्रेरणा घेऊन पूजाने टिन आणि पंख्याच्या मदतीने एक मॉडेल बनवलं, जे उडणारी धूळ बॅगेत गोळा करतं. हे मॉडेल पर्यावरणासाठी सुरक्षित होतं. तसेच शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं.
हे मॉडेल बनवण्यासाठी पूजाने सुमारे ३ हजार रुपये खर्च केले, जे तिच्या कुटुंबासाठी मोठी रक्कम होती. २०२० मध्ये हे मॉडेल जिल्हा आणि विभाग पातळीवर निवडले गेले, नंतर राज्यस्तरीय प्रदर्शनात आणि शेवटी राष्ट्रीय विज्ञान मेळाव्यात पोहोचलं. २०२४ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय विज्ञान मेळाव्यातही पूजाचं मॉडेल निवडलं गेलं.
जून २०२५ मध्ये भारत सरकारने पूजाला शैक्षणिक दौऱ्यासाठी जपानला पाठवलं होतं. तिथे तिने तिच्या मॉडेल आणि कल्पनांसाठी केवळ प्रशंसा मिळवली नाही तर प्रतिभा संसाधनांवर अवलंबून नाही हे देखील सिद्ध केलं. जपान सहलीवरून परतल्यानंतर, आता पूजाचं स्वप्न आहे की, तिच्या गावातील गरीब मुलांना खूप शिकवायचं आणि त्यांना पुढे जाण्याचा योग्य मार्ग दाखवायचा.
पूजाची गोष्ट केवळ प्रेरणादायीच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं नाव उंचावणारी मुलगी अजूनही मूलभूत सुविधांशी झुंजत आहे, या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील जनता आणि लोकांची मागणी आहे की, प्रशासनाने या प्रतिभेला लवकरात लवकर योग्य संसाधनं आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून पूजा आणखी उंच भरारी घेऊ शकेल.