Children's Health: उन्हाळ्यात डासांचा किती त्रास वाढतो हे काही कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे डास वाढतात आणि झोपेचं खोबरं होतं. कानाजवळ आवाज करणाऱ्या डासांमुळे सगळेच वैतागलेले असतात. मोठेच काय तर लहान मुलेही डासांमुळे आजारी पडतात. डास चालल्यावर झटका तर बसतोच, सोबतच त्वचेवर पुरळही येते. लहान मुलांच्या नाजूक त्वचेवर डास चावल्यामुळे आलेली पुरळ पाहून सगळेच घाबरतात. या पुरळमुळे त्वचा खाजवते आणि लालही होते. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काय करावं याबाबत पीडियाट्रिशिअन संदीप गुप्ता यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.
लहान मुलांना डास चावल्यावर काय करावं?
लहान मुलांचे डॉक्टर संदीप गुप्ता सांगतात की, लहान मुलांना जर डास चावले तर त्यांच्या त्वचेवर जळजळ होऊ लागते. ही जळजळ किंवा खाज कमी करण्यासाठी त्वचेवर बर्फ लावू शकता. यासाठी एका कापडामध्ये बर्फ बांधा आणि जिथे डास चावले तिथे लावा.
बर्फ लावल्यावरही जळजळ किंवा खाज दूर होत नसेल तर अॅंटी-सेप्टिक क्रीम किंवा कॅलामाइन लोशन लावू शकता. डास चावल्यामुळे जास्त पुरळ आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन सेट्रीजन किंवा हायड्रोक्सिजन सिरपही देऊ शकता.
डास पळवण्यासाठी काय कराल?
कापराचा धूर
कापराचा वापर तुम्ही कीटक किंवा डास पळवण्यासाठी करू शकता. यासाठी तुम्ही २ ते ३ कापराच्या वड्या जाळून रूममध्ये ठेवा. यानंतर रूम थोडावेळ बंद ठेवा. जेव्हा कापूर पूर्णपणे जळेल तेव्हा रूमचा दरवाजा उघडा. कापराच्या सुगंधाने डास तुमच्या रूममधून बाहेर पडतील.
कडूलिंबाच्या पानांचा धूर
कडूलिंब हा एक चांगला आयुर्वेदिक उपाय मानला जातो. जर तुमच्या घरात डासांनी हल्ला केला असेल तर तुम्ही कडूलिंबाच्या हिरव्या पानांचा धूर करू शकता. ही पाने जळू नये त्यांना थोडं पेटवून धूर करा. त्यातून केवळ धूर निघावा. बघता बघता घरातील सगळे डास काही वेळात बाहेर पडतील.
लसणाची पेस्ट
लसणाचा गंध जरा उग्र असतो. हा गंध डासांना सहन होत नाही. सामान्यपणे जिथे लसूण ठेवलेलं असतं तिथे डास येत नाहीत. जर तुमच्या घरात जास्त डास झाले असतील तर लसणाची पेस्ट तयार करा. रूममधील काही कोपऱ्यात ती ठेवा. डास लगेच पळतील.
पुदीन्याचा रस फायदेशीर
तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.