Pollution Impact During Pregnancy : दिल्ली एनसीआर सोबतच मोठ्या शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणाची नेहमीच चर्चा होत असते. लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे तब्येतीची अधिक काळजी घेणं महत्वाचं ठरतं. प्रदूषणामुळे केवळ फुप्फुसं डॅमेज होतात असं नाही तर याचा एकंदर आरोग्यावरही परिणाम होतो. मोठ्यांसोबतच मुलांवर सुद्धा प्रदूषणाचा प्रभाव अधिक घातक ठरू शकतो. इतकेच नाही, तर गर्भात वाढणाऱ्या बाळावरही प्रदूषणाचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेक संशोधनांतून हे स्पष्ट झाले आहे की गर्भधारणेदरम्यान आई ज्या वातावरणात राहते, त्याचा थेट परिणाम गर्भातील बाळाच्या विकासावर होतो.
गर्भातील बाळावरही प्रदूषणाचा परिणाम
आशा आयुर्वेदाच्या डायरेक्टर व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर चंचल शर्मा यांनी एका वेबसाइटला माहिती की, गर्भवती महिला ज्या वातावरणात श्वास घेते, त्या ठिकाणची हवा जर प्रदूषित असेल तर त्यातील हानिकारक कण आणि विषारी तत्व फुफ्फुसांमार्फत आईच्या रक्तात मिसळतात. हेच रक्त प्लेसेंटामार्फत गर्भातील बाळापर्यंत पोहोचतं आणि त्याच्या शारीरिक तसेच मानसिक विकासावर परिणाम करतं.
गर्भावस्थेत वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम
प्रदूषित हवेत राहिल्यामुळे गर्भातील बाळाच्या एकूण विकासावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे अकाली प्रसूतीचा धोका वाढतो, बाळाचे जन्मावेळी वजन कमी असू शकते आणि गर्भपाताचा धोका देखील वाढतो. काही अभ्यासांमध्ये असेही आढळले आहे की प्रदूषित हवेमुळे बाळाच्या फुफ्फुसांचा आणि मेंदूचा विकास नीट होत नाही, ते कमकुवत राहू शकतात. जन्मानंतर अशा मुलांमध्ये दमा, अॅलर्जी यांसारख्या आजारांची शक्यता अधिक असते.
पाणी आणि ध्वनी प्रदूषणाचाही परिणाम
बहुतेक लोक वायुप्रदूषणाबाबत जागरूक असतात, पण पाण्याचे प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यांचाही गर्भातील बाळाच्या विकासावर परिणाम होतो, हे अनेकांना माहिती नसतं. प्रदूषित पाण्यात नुकसानकारक बॅक्टेरिया आणि कीटकनाशके असू शकतात, जे गर्भवती महिला आणि गर्भातील बाळ दोघांनाही इजा पोहोचवू शकतात.
गर्भावस्थेत जास्त आवाजाच्या संपर्कात आल्यास महिलांचा रक्तदाब वाढू शकतो आणि तणाव निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावरही होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाकडेही दुर्लक्ष करू नये.
गर्भावस्थेत प्रदूषणापासून बचावाचे उपाय
शक्यतो गर्भावस्थेत घरातच रहा, बाहेर जाणे टाळा.
घरात एअर प्युरीफायरचा वापर करा.
बाहेर जाताना N95 मास्क वापरणे आवश्यक आहे.
घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरात झाडे लावा.
स्वच्छ आणि कोमट पाणी प्या.
आहारात पौष्टिक पदार्थ आणि व्हिटामिन C असलेल्या गोष्टींचा समावेश करा.
आयुर्वेदानुसार गर्भावस्थेत मन शांत ठेवणे आणि स्वच्छ वातावरणात राहणे महत्त्वाचे आहे. यामुळे बाळाचा विकास चांगला होतो आणि तणावही कमी राहतो.
