lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > Menstrual cycle : मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखते, कॉन्स्टिपेशन, नाजूक जागी इन्फेक्शन होते? ८ उपाय; हमखास आराम

Menstrual cycle : मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखते, कॉन्स्टिपेशन, नाजूक जागी इन्फेक्शन होते? ८ उपाय; हमखास आराम

Menstrual cycle : मासिक पाळीच्या काळात घेण्याची काळजी, स्ट्रेस- हार्मोनल इम्बॅलन्स यातून पुढे गर्भधारणेला त्रास आणि मासिक पाळीचे आजार होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 05:58 PM2022-02-10T17:58:30+5:302022-02-10T18:19:23+5:30

Menstrual cycle : मासिक पाळीच्या काळात घेण्याची काळजी, स्ट्रेस- हार्मोनल इम्बॅलन्स यातून पुढे गर्भधारणेला त्रास आणि मासिक पाळीचे आजार होतात.

Menstrual cycle: Abdominal pain, constipation, infection in delicate areas during menstruation? 8 remedies; Very comfortable | Menstrual cycle : मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखते, कॉन्स्टिपेशन, नाजूक जागी इन्फेक्शन होते? ८ उपाय; हमखास आराम

Menstrual cycle : मासिक पाळीच्या काळात खूप पोट दुखते, कॉन्स्टिपेशन, नाजूक जागी इन्फेक्शन होते? ८ उपाय; हमखास आराम

Highlightsकामाचा स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स, वजन अचानक कमी होणे किंवा वाढणे यांसराख्या समस्या भेडसावर असतील तर आहारात ठराविक गोष्टींचा समावेश करायला हवा...मासिक पाळीदरम्यान योग्य प्रकारची स्वच्छता पाळणे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय गरजेचे असते.

डॉ.गीतांजली वानखडे डामरे

मासिक पाळी (Menstrual cycle) दरम्यान काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.  मासिक पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव हा गर्भाशयातून योनीमार्गावाटे होतो त्यामुळे या दरम्यान योग्य काळजी न घेतल्यास जंतुसंसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. मासिक पाळीची वयोमर्यादा साधारण १२ ते ५० वर्ष अशी असते. परंतु आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीमुळे हे वय अलीकडे आलेले दिसते. मुलींचे व स्त्रियांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य हे मासिक पाळीवर अवलंबून असते. त्यामुळे मासिक पाळी नियमित असल्यास त्यांचे स्वास्थ्य चांगले राहते. हल्लीच्या काळात स्त्रियांना जॉब्स किंवा ड्युटी मुळे खूप धावपळ होते त्यांना आराम मिळत नाही. अनेक जाहिरातींमध्ये तर मुली रनिंग किंवा सायकलिंग अशा अनेक ॲक्टिव्हिटिज करताना दाखवले जाते, जे  चुकीचे आहे. याबरोबरच अलीकडच्या काळात चुकीच्या आहार-विहार पद्धती, जंकफूड खाण्याचं वाढलेलं प्रमाण, दारू - सिगारेटचं सेवन, कामामुळे वाढलेला स्ट्रेस, झोपेच्या चुकीच्या आणि अनियमित वेळा या सर्व गोष्टींचा आरोग्यावर कुठेतरी होणारा परिणाम त्यामुळे शरीरामध्ये हार्मोनल बॅलन्स होत , परिणामी पाळी अनियमित होऊन हळूहळू वंध्यत्वाचे प्रमाण वाढताना दिसते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात काळजी घ्यायला हवी.

मासिक पाळी दरम्यान नेमकी कशी आणि काय काळजी घ्यायला हवी?

१. मासिक पाळी मध्ये अनेक स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करतात परंतु तरीसुद्धा ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया ते परवडत नसल्यामुळे किंवा नाही जुन्या गैरसमजुतींमुळे कापडाच्या घडीचाच वापर करतात. पण बरेचदा असे बघायला मिळते की ते लपवून आणि कुठेतरी अडगळीच्या ठिकाणी सुकवले जाते. परिणामी त्यावर जंतू निर्माण होतात आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. याशिवाय सॅनिटरी नॅपकिन्स असो वा कापडाची घडी ते कमीत कमी ४ ते ६ तासाला बदललेच गेले पाहिजे नाहीतर त्यामुळे रॅश येऊ शकतो शिवाय वारंवार इन्फेक्शन होऊन ते पुढे मूत्रमार्ग किंवा गर्भाशयापर्यंत पसरू शकते.

२. सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावताना ते तसेच उघड्यावर फेकू नये त्याऐवजी पेपर मध्ये गुंडाळून नंतर योग्य ठिकाणी टाकावे.

३.मासिक पाळी दरम्यान योग्य ती स्वच्छता पाळावी, नियमीत अंघोळ करावी गरज असल्यास दिवसातून दोन वेळा अंघोळ करावी. योनिमार्ग आणि आजूबाजूची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. त्याकरता बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही केमिकल्स युक्त व्हजायनल वॉश वापरण्याऐवजी गरम पाण्याचा वापर करावा.

४.मासिक पाळीदरम्यान पोटदुखी किंवा कंबरदुखी चा त्रास होत असल्यास वारंवार पेन-किलर्स घेणे शक्यतो टाळावे. त्याएवजी गरम पाण्याच्या पिशवीने शेक घ्यावा, गरम पाण्याने आंघोळ करावी किंवा आल्याचा चहा घ्यावा. पाळी दरम्यान शक्यतो घट्ट कपडे जीन्स वगैरे घालणे टाळावे याऐवजी स्वच्छ, सैल आणि मोकळे कपडे वापरावेत.

५. मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होत असल्यास किंवा वारंवार इन्फेक्शन होत असल्यास वेळीच स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ला घ्यावा. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासावर घरगुती उपचार करावेत.

कामाचा स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स, वजन अचानक कमी होणे किंवा वाढणे, गर्भनिरोधक गोळ्यांचा सतत वापर करणे, पीसीओडी, पाळी नवीनच सुरू झालेली असताना किंवा पाळी बंद होण्याच्या काळात रक्तस्त्राव कोणाला कमी तर,कोणाला जास्त प्रमाणात असू शकतो; अशावेळी आहार कसा असावा याविषयी...

१. तसेच कोणाकोणाला यादरम्यान पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो अशावेळी आल्याचं सेवन परिणामकारक ठरते. पाळी येण्याच्या तीन-चार दिवस आधीपासूनच आहारात आल्याचा समावेश करावा. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव नियंत्रित होतो आणि पोट व कंबरदुखीचा त्रास कमी होतो.

२. पपईचे सेवन करणेदेखील अत्यंत परिणामकारक ठरते. पपई खाल्ल्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होऊन रक्तस्त्राव साफ होण्यास मदत होते.

३. तिळाचे नियमित सेवन केल्याने देखील पाळी नियमीत होण्यास मदत होते. यासाठी रोज सकाळी एक चमचा तीळ चाऊन खावे किंवा रोज तिळाचा एक लाडू खावा.

४. याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं, ड्रायफ्रूट्स, इत्यादींचे नियमित सेवन करावे. आपण घेत असलेल्या आहारात लोह, कॅल्शियम, झिंक, विटामिन सी, विटामिन बी, फॉलिक ॲसिड, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, फायबर्स, प्रोटीन्स यांचा समावेश असावा यामुळे गर्भाशयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तस्राव नियंत्रित होतो.

५. बऱ्याच स्त्रियांना पोट गच्च होणे किंवा मलबद्धतेचा त्रास होतो अशावेळी जास्त फायबर्स युक्त आहार घेतल्याने हा त्रास होत नाही; यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळं, अंजीर,गाजर, पत्ताकोबी यांचा आहारात समावेश करावा.

६. मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव जास्त झाल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असते अशावेळी लोहयुक्त आहार, अंजीर, काळे मनुके, खजूर, बीटरूट, पालक, यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे. परंतु आहारातून घेतलेल्या लोहाचे शरीरात शोषण होण्याकरता सोबत विटामिन सी घेणे आवश्यक असते; त्यासाठी लिंबू, दही, संत्री, पेरू, आवळा, यांचे सेवन करावे, पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.

७. आहाराबरोबरच योगासन, प्राणायाम, मेडिटेशन यांच्या नियमित अभ्यासाने शारीरिक व मानसिक आरोग्याबरोबरच गर्भाशयावर सुद्धा अत्यंत चांगला परिणाम दिसून येतो, गर्भधारणा सहज होण्यास मदत होते. ६. योगासनांमध्ये सूर्यनमस्कार,मत्स्यासन, पश्चिमोत्तानासन, धनुरासन, ही आसने गर्भाशयाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. प्राणायाम आणि मेडिटेशन मुळे स्ट्रेस लेव्हल कमी होऊन हार्मोनल बॅलन्स मेन्टेन होतो. ही किंवा इतर कोणतीही कठीण आसने पाळी सुरू असताना सुरुवातीचे ३ ते ४ दिवस करणे टाळावे.

८. नवीन रिसर्च स्टडी नुसार शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्ट्रेस, मूड स्विंग, बेचैनी अशी लक्षणे दिसतात. व्हिटॅमिन डी हे प्रामुख्याने कोवळ्या उन्हातून मिळते. त्यामुळे शक्य असल्यास सकाळी कोवळ्या उन्हात बसावे किंवा चालावे.

(लेखिका आयुर्वेद अभ्यासक आहेत.)

Web Title: Menstrual cycle: Abdominal pain, constipation, infection in delicate areas during menstruation? 8 remedies; Very comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.