- सायली शिर्के
चल बेटा सेल्फी ले ले रे! हे गाणं जसं तरुणाईच्या ओठांवर असतं तसंच त्यासाठीचा उत्साहही काही औरच... प्रसंग कोणताही असो एक सेल्फी तर झालाच पाहिजे हा सध्याचा जमाना. मस्त सेल्फी काढून तो FB, WhatsApp, Insta यावर लवकरात लवकर Upload करून जास्तीत जास्त Like & Comment मिळवण्याची भलतीच क्रेझ. कोणतीही घटना असली तरी त्या घटनेचा साक्षीदार म्हणून तर कधी आठवणींच्या कोलाजमध्ये तो क्षण जपून ठेवण्यासाठी सेल्फीचा अट्टाहास हा प्रत्येकाचाच असतोच. तरुणाईची आवड व सध्याची क्रेझ लक्षात घेऊन त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी सेल्फी पाँईटही तयार केले जातात. या सेल्फीमध्येच आता भर पडलीय ती त्या रील्सची.
रील्सचा नाद लय बेक्कार असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. सोशल मीडियाच्या या जगात चार-चौघात आपण उठून दिसावं म्हणून एकंदरीत सुरू असलेला हा खटाटोप. व्ह्यूज आणि लाईक्सच्या नादाने पोरांना अक्षरश: वेडं केलं. फॉलोअर्सच्या गर्दीत टिकून राहण्यासाठी केलेले प्रताप काही नवीन नाहीत. अवघ्या काही सेकंदाची ही चटक काहींसाठी मूड फ्रेश करणारी तर काहींसाठी जीवघेणी ठरत आहे. रील्समुळे विविध गोष्टी कमी वेळेत समजण्यास खूप मदत झाली. पण याचा जसा फायदा आहे तर तोटादेखील आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोनवर आपण रील पाहण्याच्या नादात इतका वेळ घालवतो की कधी कधी किती वाजलेत, हेच विसरून जातो.
कोणत्याही गोष्टीचा नाद लागला किंवा जास्त आहारी गेलो तर ती गोष्ट आपला घात करते सेल्फी आणि रीलचंही अगदी तसंच आहे. सेल्फी, रील काढताना आपण त्या मोबाईलमधील कॅमेरात स्वत:ला पाहण्यातच इतके रमलेलो असतो की आजूबाजूच्या परिस्थितीचं भानच राहत नाही आणि मग हाच सेल्फी किंवा रील जीवघेणं ठरतं. एखाद्या उंच ठिकाणावरून काढलेला सेल्फी, कड्याच्या टोकाला उभ राहून केलेलं रील, गर्दीच्या किंवा अपघाताच्या ठिकाणी मदतीचा हात देण्याऐवजी केलेले कारनामे, फेसाळणाऱ्या लाटा अंगावर झेलत काढलेला व्हिडीओ कधीकधी अखेरचा ठरून घात करतो.
रोजच सेल्फी आणि रील काढायच्या नादात झालेले विचित्र अपघात, दुर्घटना कानावर पडत असतात. दिवसेंदिवस या घटनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतेय हा चिंतेचा विषय आहे. कळत नकळत का होईना याचा नकारात्मक परिणाम मनावर होतो. खूप सारे सेल्फी काढणं किंवा सतत चर्चेत राहण्यालाठी रील बनवणं ही मानसिकदृष्या दुर्बलतेकडे झुकण्याची सुरुवात असल्याचं शास्त्रीयदृष्या सिद्ध झालं आहे. तसेच आपल्याला हवे असलेले लाईक्स मिळाले नाहीत किंवा फॉलोअर्स वाढले नाहीत तर खूप वाईटही वाटतं, काही जण डिप्रेशनमध्ये जातात.
खरंच कोणत्याही गोष्टीचा नाद लागला की, तो माणसाला वेडच करतो म्हणूनच सेल्फीचा नाद खुळा! आयुष्यातील महत्त्वाचे, मोक्याचे, खास प्रसंग, आठवणी, क्षण जपून ठेवण्यासाठी एक सेल्फी, रील काढण्यासाठी तरुणाई धडपडत असते. पण हे सर्व करताना आपला तोल ठासळत तर नाही ना हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आपलं सुंदर, देखणं रूप आणि आजूबाजूच्या परिसराच वेगळेपण टिपण्याबरोबरच भान राखून स्वत:चा जीव वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण तरच आपण आयुष्यभर असंख्य, स्मरणीय, सुंदर गोष्टी पुन्हा पुन्हा हमखास करू शकतो.