Obesity Causes : बाहेर आलेलं पोट, वाढलेली चरबी अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लठ्ठपणा वाढला की वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. अनेकांना असं वाटतं की, जास्त खाल्ल्याने किंवा जंक फूड खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. पण मुळात फक्त हीच कारणं लठ्ठपणाला जबाबदार नाहीत. लठ्ठपणा वाढण्याला आणखी काही गोष्टी जबाबदार असतात, ज्यांकडे फारसं कुणी लक्षच देत नाहीत. अनेक एक्सपर्ट सांगतात की, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींसोबतच कमी झोप, सतत तणावात राहणे आणि कमी शारीरिक हालचाल या तीन गोष्टी लठ्ठपणासाठी मुख्यपणे जबाबदार असतात.
कमी झोप आणि लठ्ठपणा
एका वयस्क व्यक्तीने रोज ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं असतं. जेव्हा आपण पूर्ण झोप घेत नाही, तेव्हा शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. याचा परिणाम असा होतो की, व्यक्तीला पुन्हा पुन्हा भूक लागते आणि मग ते जास्त कॅलरी इनटेक करतात. रात्री उशिरापर्यंत मोबाइल किंवा लॅपटॉपचा वापर केल्यानेही मेटाबॉलिज्म प्रभावित होतं. हळूहळू या सवयीमुळे वजन वाढू लागतं.
तणाव आणि हार्मोन असंतुलन
सतत मानसिक तणावात राहणं सुद्धा लठ्ठपणाचं एक मोठं कारण आहे. जेव्हा आपण तणावात अशतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचं प्रमाण वाढतं. कॉर्टिसोल शरीराची ऊर्जा वाचवण्यासाठी आणि फॅट जमा करण्यासाठी प्रेरित करतो, खासकरून पोटाच्या आजूबाजूला. तणावादरम्यान बरेच लोक इमोशनल ईटिंगचे शिकार होतात. म्हणजे ते तणाव कमी करण्यासाठी गोड, तळलेले, भाजलेले किंवा हाय कॅलरी फूड खाऊ लागतात. ज्यामुळे वजन अधिक वेगाने वाढतं.
कमी शारीरिक हालचाल
आजच्या लाइफस्टाईलमध्ये शारीरिक हालचाल कमी केल्याने कॅलरी कमी जळतात. शरीरातील या अतिरिक्त कॅलरी शरीरात चरबीच्या रूपात जमा होतात. जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि यामुळे वजन वाढतं.
कमी झोप, तणाव आणि सुस्त लाइफस्टाईल या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. कमी झोपेमुळे तणाव वाढतो, तणावामुळे जास्त आणि अनहेल्दी खाण्याची सवय लागते आणि थकव्यामुळे शारीरिक हालचाल कमी केली जाते. अशाप्रकारे शरीरात चरबी जमा होते. काही लोक डायटिंग करतात, पण जर झोप आणि तणावाला व्यवस्थित सांभाळलं नाही तर वजन कमी करणं अवघड होतं.
काय उपाय करू शकता?
रोज ७ ते ८ तासांची चांगली झोप घ्या
झोपण्याच्या एक तासआधी फोन आणि स्क्रीनपासून दूर रहा
तणाव कमी करण्यासाठी योगा, प्राणायाम किंवा मेडिटेशन करा
दर ३० ते ४० मिनिटांनी खुर्चीवरून उठून ५ मिनिटं वॉक करा
आठवड्यातून कमीत कमी ५ दिवस ३० मिनिटं हलका व्यायाम करा
