दुपारी जेवण झाल्यानंतर सुस्ती येणं किंवा झोप लागणं ही एक सामान्य बाब आहे, अनेकांना याचा अनुभव येतो. कदाचित तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना जेवल्यानंतर लगेच आळस जाणवतो आणि एका जागी बसून राहिल्यास डुलकी लागते. खरं तर, ही शरीराची एक नैसर्गिक गरज आहे. जर याचं योग्य पालन केलं तर ते शरीरासाठी फायदेशीरच ठरते. पण यामागचे नेमकं सायंटिफीक कारण काय आहे, ते जाणून घेऊया.
दुपारीच झोप का येते?
'स्लीप मेडिसिन' अँड इंटरनल मेडिसिन डॉ. एन. रामकृष्णन यांच्या मते, जर दुपारची झोप तुमच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम करत नसेल, तर छोटी पॉवर नॅप घेणं अगदी योग्य आहे. आपल्या शरीराला झोपेची सर्वाधिक गरज रात्री असते, परंतु दुसरी सर्वात मोठी 'स्लीप प्रोपेन्सिटी' (झोप येण्याची प्रवृत्ती) दुपारी जेवणानंतर साधारणपणे १ ते २:३० च्या दरम्यान असते.
या काळात शरीर स्वतःहून विश्रांतीची मागणी करते, म्हणूनच बहुतेकांना या वेळेत झोप लागते. मात्र, लक्षात ठेवा की ही फक्त एक पॉवर नॅप असावी, खूप झोप नव्हे. दुपारी १० ते ३० मिनिटांची झोप पुरेशी असते, पण पॉवर नॅपसाठी २० मिनिटांचा वेळ सर्वोत्तम मानला जातो. २० मिनिटांच्या या पॉवर नॅपमुळे व्यक्तीला अधिक ताजेतवानं वाटतं.
पॉवर नॅप म्हणजे काय?
डॉक्टरांच्या मते, योग्य वेळी घेतलेल्या कमी वेळेच्या झोपेला 'पॉवर नॅप' म्हणतात. या झोपेनंतर जेव्हा माणूस उठतो, तेव्हा त्याला अधिक फ्रेश वाटतं आणि त्याची कार्यक्षमता वाढते.
जर तुमच्या कामाच्या वेळापत्रकात छोटी पॉवर नॅप घेतल्याने रात्रीच्या झोपेत कोणताही अडथळा येत नसेल, तर ती नक्कीच फायदेशीर आहे. मात्र, दुपारी खूप वेळ किंवा वारंवार जास्त झोप घेतल्याने रात्रीची झोप बिघडू शकते, त्यामुळे तसं करणं टाळावं.
पॉवर नॅप घेण्याची योग्य पद्धत
वेळ - पॉवर नॅपसाठी दुपारी १ ते ३ ही वेळ सर्वोत्तम आहे. या काळात शरीराचं तापमान किंचित कमी होतं आणि नैसर्गिकरित्या सुस्ती जाणवते.
सावधानता - संध्याकाळी ४ नंतर पॉवर नॅप घेऊ नका, अन्यथा रात्रीची झोप उडू शकते.
मर्यादा - जर तुम्ही ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपलात, तर शरीर 'गाढ झोपेत' जाते. अशा वेळी उठल्यानंतर ताजेतवानं वाटण्याऐवजी डोकं जड होणं आणि अधिक सुस्ती येणं असे प्रकार घडू शकतात.
पर्याय - जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल, तर थेट ९० मिनिटांची झोप घ्या जेणेकरून तुमचं एक पूर्ण 'स्लीप सायकल' पूर्ण होईल.
