थंडीची चाहूल लागली की शरीरात काही बदल होतात. सगळ्याच ऋतुंमध्ये आहाराला फार महत्व असते. हवामानानुसार आहारात बदल करणे आरोग्यासाठी फारच आवश्यक असते. हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते. (What should be the diet in winter? see what to eat, what not to eat, health tips )अशा वेळी योग्य आहार घेणे फार महत्त्वाचे असते. हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी शरीराला पोषण आणि उष्णता देणारे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. काही साधे बदल करुन आपण हा ऋतू निरोगीपणे आणि आनंदाने जगू शकतो.
सर्वप्रथम थंड पदार्थ टाळा. थंड म्हणजे फक्त चवीला थंड नाही तर जे मुळात थंड असतात. जसे की दही, थंड दूध, आइस्क्रीम, केळी किंवा इतर काही पदार्थ जे सर्दी वाढवतात. थंड पदार्थांमुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. कोमट दूध, आलं-हळदीचं दूध किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. हे शरीराला आतून उबदार ठेवतात. तसेच उष्ण पदार्थही खा. गूळ, तीळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स, तूप, बाजरी, नाचणी, मेथी, आलं आणि सुंठ हे पदार्थ हिवाळ्यात विशेष फायदेशीर असतात. हे केवळ उष्णता देत नाहीत तर शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताकदही पुरवतात. हिवाळ्यात सर्दी-खोकला टाळण्यासाठी सूप आणि काढे पिण्याची सवय ठेवावी. भाज्यांचे गरम सूप, टोमॅटो सूप, डाळीचे सूप यामुळे शरीराला प्रथिनं आणि उब मिळते. आलं, लवंग, दालचिनी, काळी मिरी, वेलची आणि तुळशी घालून केलेला काढा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. असा काढा आहारात नक्की असायला हवा.
याशिवाय गाजर, मटार, पालक, मेथी, कारल यांसारख्या हिवाळी भाज्या नियमित खा. हंगामी भाज्या फार पौष्टिक असतात. या भाज्यांमध्ये लोह, जीवनसत्त्व ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. सकाळी थोडं तूप-गूळ किंवा चहा सोबत खजूर खाल्ल्यास शरीराला तत्काळ ऊर्जा मिळते. थंडीत पाणी कमी प्यायले जाते. घशाला कोरड पडलेली जाणवत नाही मात्र पाण्याची गरज फार असते. त्यामुळे पाणी प्यायला विसरु नका. तसेच कोमट पाणी नियमित प्या, यामुळे पचन चांगले राहते आणि त्वचा कोरडी पडत नाही. थोडक्यात सांगायचं तर, हिवाळ्यात थंड पदार्थांपासून दूर राहा, उष्ण आणि पौष्टिक पदार्थ खा, सूप आणि काढ्यांचा आस्वाद घ्या, या छोट्या सवयींनी तुम्ही थंडीच्या दिवसांतही तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहू शकता.
