Mouth Taping: आजकाल सोशल मीडियावर 'माउथ टेपिंग' नावाचा एक नवा स्लीप ट्रेंड खूप चर्चेत आहे. नावावरूनच स्पष्ट होतं की या ट्रेंडमध्ये लोक झोपताना तोंडावर टेप लावतात, जेणेकरून झोपेत तोंडाऐवजी नाकातून श्वास घेतला जाईल. लोकांचा दावा आहे की यामुळे घोरणं कमी होतं, झोप चांगली लागते आणि शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो. पण खरंच हा उपाय फायदेशीर आहे का? की झोपताना तोंडावर टेप लावल्याने नुकसानही होऊ शकते? चला सविस्तर समजून घेऊया.
झोपताना तोंडावर टेप लावणे कितपत योग्य आहे?
हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार, माउथ टेपिंगचा मुख्य फायदा म्हणजे नाकातून श्वास घेण्याला प्रोत्साहन मिळते. म्हणजेच झोपेत तोंडाऐवजी नाकातून श्वास घेतला जातो. यामुळे हवा फिल्टर होऊन आणि ओलसर स्वरूपात शरीरात जाते, सायनसच्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो, घोरण्याची समस्या कमी होऊ शकते, तोंड कोरडे पडण्याची समस्या कमी होते.
रिपोर्टनुसार, माउथ टेपिंगमुळे तोंडाचा pH बॅलन्स टिकून राहतो. त्यामुळे दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि ड्राय माउथ यापासून संरक्षण मिळू शकते. याशिवाय, नाकातून श्वास घेतल्याने शरीरात नायट्रिक ऑक्साइड अधिक तयार होते, जे मेंदूचे कार्य, हृदयाची तब्येत आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी योग्य ठेवण्यासाठी महत्त्वाचे असते. त्यामुळे काही लोकांसाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो.
याचे काही तोटेही आहेत का?
होय. रिपोर्टमध्ये पुढे सांगितले आहे की माउथ टेपिंग पूर्णपणे सुरक्षित नाही. खासकरून सर्दी, अॅलर्जी किंवा नाक कायम बंद राहत असेल, आधीपासूनच श्वास घेण्यास त्रास होत असेल अशा लोकांनी माउथ टेपिंग करू नये. झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, जे धोकादायक ठरू शकते. याशिवाय, तोंडावर टेप लावल्याने काही लोकांना त्वचेची अॅलर्जी, ओठांभोवती किंवा तोंडाजवळ इरिटेशन होऊ शकते. काही जणांना झोप लागण्यासही त्रास होतो.
मग काय करावे?
हेल्थलाइननुसार, असे ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला घोरण्याची समस्या असेल किंवा झोपताना तोंड कोरडे पडत असेल, तर माउथ टेपिंग करण्याआधी डॉक्टर किंवा स्लीप एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या. याशिवाय, या समस्यांपासून बचावासाठी काही सुरक्षित उपाय करता येतात, जसे की, झोपण्यापूर्वी वाफ घेणे, त्यामुळे नाक मोकळे होते. घोरण्याची समस्या असल्यास झोपण्याची पोझिशन बदलणे, योग्य उशी वापरण्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणे, झोपण्यापूर्वी पुरेसे पाणी किंवा हायड्रेटिंग ड्रिंक घेणे इत्यादी.
