इन्स्टाग्राम रील्ससारखे छोटे व्हिडीओ पाहायला सर्वांनाच आवडतं. मनोरंजनाचं ते एक उत्तम साधन आहे. व्हिडीओ पाहण्यात वेळ कधी जातो हे समजतच नाही. काही लोक तासनतास रील्स पाहत असतात. पण आता यासंदर्भात एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. रील्स, छोटे व्हिडीओ पाहणं हे अत्यंत धोकादायक असल्याचा खुलासा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. सतत व्हिडीओ पाहण्याची सवय ही दारू पिण्यापेक्षाही पाच पटीने जास्त मेंदूचं नुकसान करतं.
छोटे व्हिडीओ सतत पाहण्याची सवय थेट दारू, सिगारेट आणि जुगार खेळण्याच्या व्यसनाप्रमाणेच आपल्या मेंदूवर वाईट परिणाम करत आहे. यामुळे तुमच्या मेंदूची कार्यक्षमता आणि आनंद अनुभवण्याची क्षमता कमी होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. रिसर्चमधून खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. मेंदूला नेमका कसा धोका निर्माण होतो. हे जाणून घेऊया...
मेंदूला मोठा धोका
टियांजिन नॉर्मल युनिव्हर्सिटी येथील प्रोफेसर कियांग वांग यांच्या नेतृत्वाखालील ‘न्यूरोइमेज’ (NeuroImage) मध्ये प्रकाशित झालेल्या रिसर्चनुसार, जे लोक मोठ्या प्रमाणात छोटे व्हिडीओ पाहतात, त्यांच्या मेंदूच्या रिवॉर्ड पाथवेमध्ये जास्त सक्रियता दिसून येते. हीच यंत्रणा दारू किंवा जुगारामुळे उत्तेजित होते. प्रत्येक वेळी रील स्क्रोल केल्यावर किंवा पाहिल्यावर डोपामाइन (Dopamine) रिलीज होतं. ज्याचा थेट संबंध हा आपल्या भावना आणि एकाग्रतेशी असतो.
छोट्या व्हिडीओमुळे रिलीद होणाऱ्या या 'डोपामाइन हिट्स'ची सवय लागते. त्यानंतर आपला मेंदू अतिसंवेदनशील होतो. त्यामुळे साधा आनंद, जसं की पुस्तक वाचणं, जेवणाचा आस्वाद घेणं किंवा शांतपणे गप्पा मारणें हे सर्व नीरस आणि कंटाळवाणे वाटू लागतं.
इतकंच नव्हे, तर रील्सचा वेगाने आणि सतत बदलणारा कंटेट मेंदूच्या पुढील भागावर (Prefrontal Cortex) स्ट्रेस आणतो. हा भाग निर्णय क्षमता, एकाग्रता आणि इमोशनल कंट्रोल करतो. हा स्ट्रेस अनेकदा दारूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या मानसिक त्रासासारखा असतो, ज्यामुळे एका कामावर लक्ष केंद्रित करणं किंवा महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत कठीण होतं.
अशी घ्या काळजी
स्क्रीन टाइम लिमिट
सतत मोबाईल पाहिल्याने डोळ्यांना खूप त्रास होतो. एप्समधील 'टाइम लिमिट'चा वापर करून रील्स पाहण्यावर मर्यादा घाला.
नियमित ब्रेक
दर २०-३० मिनिटांनी स्क्रीनपासून दूर व्हा आणि डोळ्यांना तसेच मेंदूला आराम द्या.
पुरेसा आराम
झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्क्रीन पाहणं शक्यतो टाळा. जेणेकरून चांगली झोप लागेल.
जगण्यातला आनंद घ्या
छंद जोपासा, आपल्या आवडी-निवडीला विशेष महत्त्व द्या आणि मित्रमैत्रिणी-परिवारासोबत वेळ घालवा. फिरायला जा. विश्रांती घ्या. जगण्याचा आनंद घ्या.