ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. म्हणूनच लोक सकाळच्या नाश्त्यात किंवा दिवसभर ऊर्जा मिळविण्यासाठी ज्यूस पिणं पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की असे काही ज्यूस आहेत जे फायद्याऐवजी नुकसान करू शकतात? डाएटिशियन शिल्पा अरोरा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितलं आहे की, काही खास ज्यूस शरीरावर वाईट परिणाम करू शकतात. ते ३ ज्यूस कोणते आहेत आणि ते का टाळावेत हे जाणून घेऊया...
संत्र्याचा ज्यूस
डाएटिशियन म्हणतात की, संत्र आरोग्यासाठी खूप चांगलं आहे कारण त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असतं. पण जेव्हा ते ज्यूसच्या स्वरूपात प्यायलं जातं तेव्हा त्याचे फायदे कमी होतात. ज्यूस बनवल्यावर संत्र्यातून फायबर काढून टाकलं जातं आणि त्यात फक्त साखरच राहते. ही साखर रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते आणखी धोकादायक ठरू शकतं. म्हणून संत्र्याचा ज्यूस पिण्याऐवजी संत्र खाणं अधिक चांगलं आहे.
डाळिंबाचा ज्यूस
डाळिंब आतड्यांच्या आरोग्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. पण जेव्हा आपण त्याचा ज्यूस पितो तेव्हा त्यात असलेलं फायबर पूर्णपणे नाहीसं होतं. डाएटिशियन म्हणतात की, पचनासाठी फायबर आवश्यक असतं आणि ते आपल्या आतड्यांचे आरोग्य योग्य ठेवतं. ज्यूसमध्ये फक्त साखर आणि पाणी राहतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते.
बीटाचा ज्यूस
शिल्पा अरोरा बीटाचा ज्यूस न पिण्याचा सल्ला देतात. बीट हे आयर्न आणि मिनरल्सचा चांगला सोर्स आहे. बरेचदा लोक तो ज्यूस बनवून पितात, परंतु शिल्पा म्हणतात की, ज्यूस बनवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. तसेच, त्यात असलेली नैसर्गिक साखर थेट रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करते. जर तुम्हाला मधुमेह किंवा रक्तदाबाची समस्या असेल तर बीटाचा रस आणखी नुकसान करू शकतो. तुम्ही बीटाचं सॅलड किंवा भाजी म्हणून खाल्ल्यास ते आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरू शकतं.