महाराष्ट्रात घरोघरी भाकरी खाल्ली जाते. पिठलं असेल किंवा एखादी झणझणीत भाजी असेल तर भाकरी केली जाते. त्यातही प्रकार आहे. तांदळाची, ज्वारीची, बाजरीची इतरही काही प्रकार आहे. भाकरी प्रचंड पौष्टिक असते. (Traditional Indian Food, Maharashtra Food, eating Bhakri daily can keep you healthy)गरमागरम भाकरी खाताना जिभेला जेवढा आनंद मिळतो, तेवढाच भाकरी पोटात गेल्यावर पोटालाही मिळतो. आहारात भाकरी असायलाच हवी. पाहा भाकरी खाण्याचे किती फायदे आहेत. भाकरी ही पारंपरिक भारतीय पदार्थांपैकी एक आहे. भाकरी ज्या धान्यांची केली जाते, त्या धान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि अँण्टीऑक्सिडंट्स असतात. जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
बाजरीच्या भाकरीत लोह, मॅग्नेशियम, झिंक यांसारखी पोषणमूल्ये भरपूर असतात. भाकरी नियमित खाल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी सुधारते. जर अशक्तपणा येणे, थकवा येणे, दम लागणे असे त्रास होतात तर नियमित भाकरी खाल्याने शरीरातील पोषण वाढते. बाजरीची भाकरी पचायला हलकी असून ती मधुमेहाचा त्रास असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.नाचणीच्या भाकरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असते. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि महिलांसाठी नाचणीचे सेवन विशेष फायदेशीर ठरते. शिवाय, नाचणीमध्ये अँण्टीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींसाठी फायद्याचे असतात. ज्वारीची भाकरी देखील फायबरने परिपूर्ण असते. ती बद्धकोष्ठतेसारख्या पाचनसंबंधी समस्या दूर करते. याशिवाय, ज्वारीत असणारे अन्नघटक हृदयाच्या आरोग्यास उपयुक्त असून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
भाकरीत तेलाचा वापर कमी असतो आणि ती तुपाविना किंवा फार थोड्या तुपासहही खाल्ली जाते. त्यामुळे ती हलकी आणि पचायला सोपी असते. बाजारात मिळणाऱ्या प्रोसेस्ड ब्रेड किंवा मैद्याच्या पदार्थांपेक्षा भाकरी कधीही उत्तम. तसेच पोळी, फुलके खायला हवेच. मात्र वजन कमी करण्यासाठी भाकरी एकदम मस्त पर्याय आहे. ग्रामीण भागात भाकरी हा आहाराचा अविभाज्य भाग आहे. भाकरीने पोट जास्त वेळासाठी भरलेले राहते तसेच शरीराला गरज असलेली ताकद वाढवण्यात भाकरी मदत करते.