Kidney Damage Symptoms At Night : सामान्यपणे कोणतेही रिसर्च किंवा हेल्थसंबंधी लेख पाहिले तर त्यात आजारांच्या कारणांमध्ये मुख्यपणे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलती लाइफस्टाईल, कमी शारीरिक हालचाल या गोष्टींचा केलेला असतो. या कारणांमुळेच हार्ट, लिव्हर आणि किडनीसंबंधी समस्या वाढल्याचं बघायला मिळत आहे. यात चिंतेची बाब ही आहे की, बरेच आजार असे असतात ज्यांचं निदान उशीरा होतं. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. किडनीच्या आजारांबाबत असंच सांगता येतं. कारण किडनीसंबंधी काही समस्या असेल किंवा किडनी डॅमेज होत असेल तर लवकर याची लक्षणं दिसत नाहीत. जी लक्षणं दिसतात ती सामान्य समजून दुर्लक्ष केलं जातं. किडनीमध्ये काही बिघाड झाला असेल तर वेगवेगळी लक्षणं दिसतात. त्यातील एक लक्षण रात्री दिसतं.
किडनीमध्ये बिघाडाचं रात्री दिसणारं लक्षण
आयुर्वेद डॉक्टर प्रताप चौहान यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, जर रात्री आपल्याला दोन ते तीन वेळा लघवीला उठावं लागत असेल तर हा किडनीमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संकेत असू शकतो. इतकंच नाही तर डोळ्यांखाली सूज असेल किंवा सकाळी झोपेतून उठल्यावर जडपणा वाटत असेल तर या गोष्टी इशारा देत आहेत की, किडनी हळूहळू कमजोर होत आहे. जर आपल्यासोबतही असं होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
किडनी डॅमेजची कारणं
डॉक्टरांनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये पुरेसं पाणी न पिणे, रात्री उशीरा जागरण, बाहेरचं खाणं-पिणं या गोष्टींचा शरीरातील अवयवांवर प्रभाव पडत आहे. किडनी सतत आपलं शरीर साफ करण्याचं काम करत असतात. पण जेव्हा शरीरातील विषारी तत्व जमा होऊ लागतात, ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा किडनीवर दबाव पडू लागतो.
आयुर्वेदानुसार, जेव्हा आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ यांच्यातील संतुलन बिघडतं तेव्हा याचा प्रभाव थेट आपल्या किडनीच्या आरोग्यावर पडतो. अशात सतत थकवा, झोप न लागणे किंवा त्वचेवर खाज अशी लक्षणं दिसू लागतात.
जर वेळीच या लक्षणांकडे लक्ष दिलं नाही आणि सामान्य समजून कानाडोळा केला तर लवकरच डायलिसिस करण्याची किंवा किडनी ट्रान्सप्लांटची वेळ येऊ शकते. अशात जर ही वेळ येऊ द्यायची नसेल तर लक्षणं ओळखा आणि वेळीच योग्य ते उपचार घेत जात.
काही आयुर्वेदिक उपाय
- सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी प्या.
- दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं आणि रात्री हलकं जेवण करावं. तेही लवकर करावं.
- किडनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर चिंता, तणावापासून दूर रहा. यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.
- वेगवेगळी आंबट फळं किडनी साफ करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. तसेच रोज हलका व्यायाम करणं देखील महत्वाचं ठरतं.