Amla Side Effects : आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असतं. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारततं, त्वचा आणि केसांना फायदा होतो आणि हृदय देखील निरोगी राहतं. पण इतके फायदे असूनही काही लोकांसाठी आवळा नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे काही लोकांनी तो पूर्णपणे टाळावा किंवा कमी प्रमाणात खावा. आता आवळा कुणी टाळावा हे आपण पाहुयात.
लो ब्लड प्रेशर असलेले रुग्ण
आवळ्यामध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे तो उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी उपयोगी ठरतो, पण ज्यांचा रक्तदाब आधीच कमी असतो किंवा जे लो बीपीच्या औषधांचा वापर करतात, त्यांच्यासाठी तो हानिकारक ठरू शकतो. आवळा जास्त प्रमाणात खाल्ल्यास ब्लड प्रेशर आणखी खाली जाऊ शकतं, ज्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा किंवा बेशुद्धी येऊ शकते.
उपाशी पोटी आवळा खाणारे लोक
आवळा थंड असतो. त्यामधील व्हिटामिन-सी आणि इतर आम्लीय तत्व संवेदनशील पोटासाठी त्रासदायक ठरू शकतात. उपाशी पोटी आवळा किंवा आवळ्याचा रस घेतल्यास अॅसिडिटी, गॅस्ट्रायटिस किंवा पोटात जळजळ होऊ शकते. त्यामुळे आवळा नेहमी जेवणानंतर किंवा काहीतरी खाल्ल्यानंतरच घ्यावा.
मधुमेहाच्या औषधांचा वापर करणारे रुग्ण
आवळा रक्तातील साखर कमी करण्यात मदत करतो. मात्र जे रुग्ण आधीपासून मधुमेहाच्या औषधांचा वापर करतात, त्यांनी आवळा कमी प्रमाणात खावा. कारण औषध आणि आवळ्याचा एकत्रित परिणाम रक्तातील साखर कमी करू शकतो, ज्यामुळे हायपोग्लायसेमियाचा धोका वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांनी आवळा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सर्जरीआधी
आवळा रक्तदाब आणि रक्तातील साखर दोन्हीवर परिणाम करतो. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या आधी आवळा खाणे टाळावे. कारण सर्जरीदरम्यान किंवा नंतर रक्तदाब आणि साखरेचा स्तर नियंत्रित ठेवणे कठीण होऊ शकते.
रक्तस्त्राव होत असेल तर
आवळा रक्त पातळ करण्याचे कार्य करतो. त्यामुळे हिमोफिलियासारख्या आजाराने ग्रस्त रुग्णांनी किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्यांनी आवळा मर्यादित प्रमाणातच खावा. अन्यथा दुखापत झाल्यास रक्त थांबण्यास वेळ लागू शकतो किंवा आंतरिक रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो.



