Breakfast Timing Tips : सामान्यपणे सगळेच लोक सकाळी घरातून कामासाठी बाहेर पडण्याआधी नाश्ता करतात. तर काही लोक बाहेर जाऊन नाश्ता करतात. नाश्ता हा आपल्या दिवसातील तीन जेवणांपैकी महत्वाचा भाग आहे. कारण दिवसभर एनर्जी टिकवायची असेल तर नाश्ता करणं भाग आहे. पण आपण नाश्त्यात काय आणि किती खातो, प्रोटीन–कार्ब्सचं संतुलन कसं असतं. इतकंच नाही तर नाश्ता कोणत्या वेळी करतो हेही आपल्या आरोग्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. कारण उशिरा नाश्ता केला तर याचे आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होतात.
युकेमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जेवणाची वेळ आपल्या मेटाबॉलिझम, झोप आणि एकूणच आरोग्यावर मोठा प्रभाव टाकते. खासकरून वृद्ध व्यक्तींवर याचा परिणाम जास्त दिसून येतो.
उशिरा नाश्ता करण्याचे तोटे
संशोधनात असे आढळून आले की उशिरा नाश्ता केल्याने डिप्रेशनची शक्यता वाढू शकते. दिवसभर थकवा जाणवतो, ओरल हेल्थ बिघडू शकते आणि काही संशोधकांच्या मते, मृत्यूचा धोकाही वाढू शकतो.
नाश्त्याची योग्य वेळ काय?
सकाळी झोपेतून उठल्यानंतर १–२ तासांच्या आत नाश्ता करणे सर्वात चांगले. शक्य असल्यास सकाळी ७ ते ८ या वेळेत नाश्ता करा. त्यामुळे तुम्ही दुपारचे जेवण १ च्या सुमारास आणि रात्रीचे जेवणही वेळेवर करू शकता.
नाश्त्यात किती प्रोटीन घ्यावे?
नाश्त्यात २५–३० ग्रॅम प्रोटीन नक्की घ्या. यासाठी नट्स, अंडी, बीन्स, डाळी यांचा समावेश करा. यामुळे मसल्स मजबूत होतात, मेंदूचं आरोग्य सुधारतं आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
नाश्त्याचा वेळ कसा टिकवायचा?
शक्य असल्यास नाश्त्याची तयारी रात्रीच करून ठेवा. यामुळे घाईत अनहेल्दी काही खाण्याची शक्यता कमी होते. रोज एकसारखे खाण्यापेक्षा रेसिपींमध्ये बदल करा. तुमच्या सोयीच्या काही हेल्दी रेसिपीज मोबाईल किंवा डायरीमध्ये लिहून ठेवा. नाश्त्यासोबत फळं खाण्यापेक्षा अर्धा तास अंतराने फळे खा. यामुळे नाश्ता आणि फळ दोन्हीचे फायदे व्यवस्थित मिळतात.
