Kidney Damage Symptoms: आपल्या शरीरातील सगळीच अवयवं महत्वाचं असतात. प्रत्येकाची कामं वेगवेगळी असतात. पण तरी सुद्धा ही अवयवं एकमेकांशी जोडलेली असतात. त्यामुळे जर शरीरात एखाद्या अवयवात काही गडबड असेल तर त्याचा प्रभाव इतरही अवयवांवर दिसू लागतो. आपल्या शरीरातील किडनी अशाच अवयवांपैकी एक आहे. जेव्हा किडनी योग्यपणे काम करत नाही, तेव्हा त्याचा प्रभाव शरीरावर दिसू लागतो. किडनीमध्ये जर काही गडबड असेल तर शरीराच्या काही भागांमध्ये सूज बघायला मिळते. अशात कुठे कुठे सूज येते तेच जाणून घेऊया.
कुठे कुठे येते सूज?
- जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला चेहऱ्यावर, खासकरून डोळ्यांखाली पफीनेस किंवा सूज दिसत असेल तर हे किडनी खराब होत असल्याचं सगळ्यात कॉमन लक्षण असू शकतं. याचं कारण किडनी पुरेशा प्रमाणात प्रोटीन फिल्टर करत नाही, ज्यामुळे शरीरात द्रव्य पदार्थ जमा होतात. त्यामुळे सूज येते.
- दिवसभर चालल्या-फिरल्यानंतर जर पायांवर, टाचांवर सूज जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे शरीरात तरल पदार्थ जमा होत असल्याचं लक्षण आणि किडनी खराब होत असल्याचा संकेत आहे.
- जर तुमच्या बोटांवर सूज येत असेल किंवा अंगठ्याच्या आजूबाजूला जडपणा जाणवत असेल तर हा सुद्धा किडनीसंबंधी समस्येचा संकेत असू शकतो.
- किडनीमध्ये जेव्हा काही गडबड होते तेव्हा पोटाच्या खालच्या भागात किंवा कंबरेत सूज येते किंवा वेदना होतात. हा किडनीमध्ये स्टोन झाल्याचा संकेत असू शकतो.
- तसेच सतत थकवा, कमजोरी, भूक न लागणे, अचानक वजन वाढणे हेही किडनीसंबंधी आजारांची लक्षणं असू शकतात.
टेस्ट करण्याची गरज कधी?
वर सांगण्यात आलेली कोणतीही लक्षणं तुम्हाला जाणवत असतील किंवा पुन्हा पुन्हा सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. डॉक्टरांच्या सल्ल्यानं किडनीसंबंधी ब्लड टेस्ट करावी. किडनीसंबंधी समस्या जाणून घेण्यासाठी ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट आणि अल्ट्रासाउंड केलं जातं.
किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय?
किडनी निरोगी ठेवण्यासाठी रोज भरपूर पाणी प्यावं. दिवसभरातून किमान 3 ते 4 लीटर पाणी प्यावं.
जास्त प्रमाणात मीठ खाणं किडनीसाठी खूप घातक असतं. त्यामुळे मीठ कमी खा.
मद्यसेवन आणि धूम्रपान सुद्धा किडनीसाठी खूप घातक असतं. दोन्ही गोष्टी टाळाव्यात.
नियमित व्यायाम करा. ब्लड प्रेशर आणि शुगर नियंत्रित ठेवा.