प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. दैनंदिन जीवनात, आपण अनेकदा प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल खरेदी करतो किंवा जुन्या बॉटल धुतो आणि त्या पुन्हा पुन्हा वापरतो. जर तुम्ही असं करत असाल तर आताच थांबा. कारण यामुळे आपल्या आरोग्याला आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या बॉटल आपल्या पिण्याच्या पाण्यात मायक्रोप्लास्टिक सोडतात. मायक्रोप्लास्टिक हे अत्यंत लहान प्लास्टिकचे कण आहेत, ज्यांचे आकार ५ मिमी पेक्षा कमी आहे. ते आपल्या जलस्रोतांमध्ये विविध प्रकारे प्रवेश करतात. जेव्हा आपण प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पितो तेव्हा आपण नकळत हे लहान कण शरीरात जातात.
अनेक रिसर्चमध्ये बाटलीबंद पाण्यात सूक्ष्म प्लास्टिक आढळून आलं आहे, ज्यामुळे आरोग्यावरील परिणामांबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. प्लास्टिकमधील काही केमिकल्स शरीरात प्रवेश करतात आणि हार्मोनल असंतुलन, लठ्ठपणा, प्रजननक्षमतेवर परिणाम आणि काही प्रकरणांमध्ये कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांचा धोका निर्माण होतो. या कणांच्या दीर्घकालीन परिणामांवर रिसर्च चालू असताना सध्याचे पुरावे सूचित करतात की सूक्ष्म प्लास्टिक जळजळ, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि हानिकारक केमिकल्सच्या ट्रान्सफरचं कारण असू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) ने या विषयावर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. सर्वात आधी प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करणं सोडून द्या आणि स्टील, काच किंवा BPA-फ्री बॉटल वापरा. दुसरं म्हणजे पाण्यातील दूषित घटक, विशेषतः मायक्रोप्लास्टिक्स कमी करू शकणारी पाणी गाळण्याची प्रणाली वापरा. प्रत्येक फिल्टर परिपूर्ण नसतो, परंतु सुधारित तंत्रज्ञानासह फिल्टर मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करतात. प्लास्टिकच्या बॉटलमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी गंभीर नाही. प्रत्येक टाकून दिलेली बाटली सागरी जीवन, नद्या आणि संपूर्ण परिसंस्थांना हानी पोहोचवते, ज्यामुळे प्लास्टिक कचऱ्याची समस्या आणखी वाढते.
