Open Mouth Sleeping Side Effects: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत योग्य आहार तर दूरच, पण अनेकांना पुरेशी आणि दर्जेदार झोपही मिळत नाही. यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार रोज 6 ते 7 तासांची चांगली झोप घेणं आवश्यक आहे. मात्र काही लोक 6–7 तास झोपूनही थकवा, डोकेदुखी किंवा अस्वस्थता जाणवते असं सांगतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे योग्य पद्धतीने झोप न लागणं.
अनेक लोकांमध्ये एक सवय दिसून येते ती म्हणजे तोंड उघडं ठेवून झोपणं. पण तुम्हाला माहिती आहे का, ही सवय आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही? यामुळे केवळ झोप बिघडत नाही, तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मग प्रश्न पडतो तोंड उघडं ठेवून का झोपू नये? याचे कारणे आणि दुष्परिणाम काय आहेत? चला जाणून घेऊया.
काही लोक तोंड उघडं ठेवून का झोपतात?
Cleveland Clinicच्या अहवालानुसार, तोंड उघडं ठेवून झोपण्यामागे अनेक कारणं असू शकतात. उदा. नाक बंद होणं, अॅलर्जी, सर्दी-खोकला, दमा, ताणतणाव, झोपण्याची चुकीची पद्धत इत्यादी.
नाक बंद असल्यास किंवा श्वास घेण्यास अडचण असल्यास लोक नकळत तोंडातून श्वास घेऊ लागतात. अॅलर्जीमुळे नाकात सूज येऊन ते बंद होतं, त्यामुळेही तोंडातून श्वसन सुरू होतं.
तोंडातून श्वास घेण्याची लक्षणं
तोंडातून श्वास घेणं लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच त्रास देऊ शकतं. याची सामान्य लक्षणं खालीलप्रमाणे दिसतात.
- तोंडातून दुर्गंधी येणं
- झोपेत लाळ गळणं
- तोंड कोरडं पडणं
- सतत थकवा जाणवणं
- आवाज बसण
- घोरणं
तोंड उघडं ठेवून झोपणं का टाळावं?
1. श्वासास दुर्गंधी येते
रात्री तोंड उघडं ठेवून झोपल्यास तोंडात जास्त घाण साचते. त्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि श्वासाला दुर्गंधी येऊ लागते.
2. दातांच्या समस्या वाढतात
तोंड उघडं राहिल्यामुळे लाळेचं उत्पादन कमी होतं. लाळ कमी झाल्याने तोंडातील बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे दात किडणे, हिरड्यांचे आजार अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
3. ऑक्सिजन कमी मिळतो
तोंडातून श्वास घेतल्यास फुफ्फुसांपर्यंत जाणारा ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो. यामुळे थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो.
4. तोंड आणि ओठ कोरडे पडतात
रात्री तोंड उघडं राहिल्यामुळे तोंडातील ओलावा कमी होतो. त्यामुळे ओठ कोरडे पडून फुटतात आणि तोंडात जळजळ होऊ शकते.
5. ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या समस्या
तोंडातून श्वास घेतल्याने शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे धमन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हाय ब्लड प्रेशर व हृदयविकारांचा धोका वाढू शकतो.
