हिवाळ्यात थंडी वाजत असल्याने काही लोकांना सूर्यप्रकाश आनंददायी वाटतो. अनेकदा लोकांना थंडी टाळण्यासाठी तासन्तास उन्हात बसायला आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का की जास्त वेळ उन्हात बसल्याने तुमच्या त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं. या सवयीमुळे स्किन कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो.
सूर्याच्या तीव्र अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे त्वचेच्या सेल्सचं नुकसान होऊ शकतं. या नुकसानामुळे अकाली वृद्धत्व तर येतंच, पण स्किन कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. 'मेकॅनिकल बिहेवियर ऑफ बायोमटेरियल्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अल्ट्राव्हायोलेट किरणं त्वचेचा सर्वात वरचा थर (स्ट्रॅटम कॉर्नियम) कमकुवत करतात, ज्यामुळे सनबर्न आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
स्किन कॅन्सरचे प्रकार
बेसल सेल कार्सिनोमा - हा स्किन कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि सामान्यतः चेहरा आणि हात यासारखे जे अवयव सूर्यकिरणांच्या संपर्कात येतात तेथे परिणाम दिसतो.
स्क्वॅमस सेल कार्सिनोमा - हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असलेल्या त्वचेवर देखील विकसित होतो आणि अनेकदा चेहरा, कान, ओठ आणि हातांवर याचा परिणाम दिसून येतो.
मेलानोमा - स्किन कॅन्सरचा हा सर्वात घातक प्रकार आहे. शरीराच्या इतर भागांमध्ये हा वेगाने पसरू शकतो.
अशी घ्या काळजी
- दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत कडक ऊन टाळा.
- बाहेर जाताना पूर्ण कपडे घाला आणि डोक्यावर टोपी किंवा स्कार्फ घ्या.
- उन्हात बाहेर जाण्यापूर्वी किमान SPF ३० असलेलं सनस्क्रीन लावा.
- सनग्लासेस वापरा जेणेकरून तुमचे डोळे सुरक्षित राहतील.
तज्ज्ञांचा सल्ला
WHO च्या मते, २०२२ मध्ये मेलेनोमामुळे ६०,००० लोकांचा मृत्यू होईल. तज्ज्ञ म्हणतात की, हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा आनंद घ्या, परंतु खबरदारी घ्यायला देखील विसरू नका. आपल्या त्वचेचं रक्षण करा आणि सनस्क्रीन आणि योग्य कपड्यांसह निरोगी राहा.