Join us
Daily Top 2 Weekly Top 5

आरोग्याला मोठा धोका! टॉयलेट सीटपेक्षा ४०,००० पट जास्त घाणेरडी असू शकते पाण्याची बाटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 16:18 IST

पाण्याच्या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत तब्बल ४०,००० पट जास्त बॅक्टेरिया असतात. जर तुम्हीही बराच काळ एकच बाटली वापरत असाल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे.

पाण्याची एकच बाटली अनेक लोक वारंवार वापरतात. बाटली वापरल्यानंतर ती लगेच फेकून देणारे किंवा बदलणारे लोक खूप कमी आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही 'रीयूजेबल' म्हणजेच पुन्हा वापरता येणारी बाटली तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. एका नवीन रिसर्चमधून हा धडकी भरवणारा दावा करण्यात आला आहे. रिसर्चनुसार, पाण्याच्या बाटल्यांमध्ये टॉयलेट सीटच्या तुलनेत तब्बल ४०,००० पट जास्त बॅक्टेरिया असतात. जर तुम्हीही बराच काळ एकच बाटली वापरत असाल, तर आता सावध होण्याची वेळ आली आहे.

अमेरिकेतील 'वॉटरफिल्टरगुरु डॉट कॉम' च्या संशोधकांच्या टीमने रीयूजेबल पाण्याच्या बाटल्यांच्या स्वच्छतेबाबत तपासणी केली. त्यांनी बाटलीच्या प्रत्येक भागाची तीन वेळा तपासणी केली. बाटलीवर दोन प्रकारचे बॅक्टेरिया आढळले, ज्यात 'ग्राम-नेगेटिव्ह' बॅक्टेरिया आणि 'बॅसिलस' बॅक्टेरियांचा समावेश आहे.  ग्राम-नेगेटिव्ह बॅक्टेरिया विविध प्रकारचे इन्फेक्शन्स पसरवण्यासाठी कारणीभूत असतात, तर बॅसिलस बॅक्टेरियामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात. या रिसर्चमध्ये बाटल्यांच्या स्वच्छतेची तुलना घरातील इतर वस्तूंशी केली गेली, तेव्हा असं आढळलं की बाटल्यांमध्ये स्वयंपाकघरातील सिंकपेक्षाही दुप्पट बॅक्टेरिया असतात.

बाटलीचा पुनर्वापर आरोग्यासाठी धोकादायक

संशोधकांनी असंही सांगितलं की, संगणकाच्या माऊसमध्ये जेवढे बॅक्टेरिया असतात, त्याच्या चार पट जास्त बॅक्टेरिया पाण्याच्या बाटलीत असतात. पाळीव प्राण्याच्या पाण्याच्या भांड्यात जेवढे बॅक्टेरिया असतात, त्यापेक्षा १४ पट जास्त बॅक्टेरिया तुमच्या बाटलीत असू शकतात. हे संशोधन नक्कीच भीतीदायक आहे, कारण मोठ्या संख्येने लोक एकच बाटली वारंवार वापरतात. मात्र युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. सायमन क्लार्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या बाटलीत मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया असले तरी, ते प्रत्येक वेळी आरोग्यासाठी तितकेच धोकादायक ठरतीलच असं नाही.

अस्वच्छ बाटलीमुळे होणारं नुकसान

जर एकच बाटली अनेक दिवस न धुता वापरली, तर त्यात वाढणारे बॅक्टेरिया थेट आपल्या शरीरात जाऊ शकतात. यामुळे पोटदुखी, घसा खवखवणे, एलर्जी किंवा अ‍स्थमा, वेगवेगळ्या प्रकराचं इन्फेक्शन यांसारख्या समस्या वाढू शकतात. अनेक रिसर्टचमध्ये बाटलीच्या आतील पृष्ठभागावर 'बायोफिल्म' (एक चिकट थर) आढळला आहे, ज्यामध्ये ई. कोली आणि स्टॅफिलोकोकससारखे हानिकारक बॅक्टेरिया असतात.

'कलर कोड'चं सत्य! निळा, काळा की हिरवा... कोणत्या रंगाचं झाकण असलेल्या बाटलीत शुद्ध पाणी?

पाण्याची बाटली किती वेळा धुवावी?

दररोज पाण्याची बाटली धुणं हे सर्वात उत्तम आहे.

जर दररोज धुणे शक्य नसेल, तर आठवड्यातून किमान एकदा 'डीप क्लीन' (खोलवर स्वच्छता) नक्की करा.

ज्यांच्या बाटलीत फक्त साधं पाणी असते, ते दोन दिवसांतून एकदा धुवू शकतात.

जर तुम्ही बाटलीत एनर्जी ड्रिंक, ज्यूस किंवा शेक टाकत असाल, तर ती रोजच्या रोज स्वच्छ करणं गरजेचं आहे.

बाटली स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

कोमट पाण्याने बाटली, झाकण आणि स्ट्रॉ धुवा. स्पंज किंवा ब्रशने नीट घासून काढा. 

रात्रभर व्हिनेगर, बेकिंग सोडा किंवा डेंचर क्लीनिंग टॅब्लेटच्या द्रावणात बाटली भिजवून ठेवा आणि सकाळी गरम पाण्याने धुवा. 

स्ट्रॉ किंवा नोझल्ससाठी पातळ पाईप ब्रश वापरा, जेणेकरून कोपऱ्यात अडकलेली घाण निघून जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Reusable Water Bottles: More Germs Than Toilet Seats, Study Reveals

Web Summary : Reusable water bottles harbor 40,000 times more bacteria than toilet seats, a study reveals. These bottles contain harmful bacteria linked to infections and stomach issues. Regular cleaning is crucial to avoid health risks like stomach pain and infections. Clean with warm, soapy water or vinegar solutions.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यपाणी