विज्ञानाची कमाल आपल्याला नेहमीच पाहायला मिळते अशीच एक दिलासादायक बातमी आता समोर आली आहे. संशोधकांनी एक ओरल कॅप्सूल विकसित केली आहे ज्याचा वापर स्मार्टफोन ॲपद्वारे आतड्यांतील बॅक्टेरिया नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे आरोग्याचं डिजिटल निरीक्षण करता येणार आहे.
चीनमधील तियानजिन विद्यापीठ आणि इतर संस्थांच्या टीमने कोलन इन्फ्लेमेशन असलेल्या डुकरांवर या कॅप्सूलची चाचणी केली. नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात, संशोधकांनी ही कॅप्सूल आतड्यांतील बॅक्टेरिया नियंत्रित करण्यास कशी मदत करू शकते हे सांगितलं आहे.
एस्चेरिचिया कोलाई (ई. कोलाई) सारखे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल बॅक्टेरिया आरोग्यावर परिणाम करणारे म्हणून ओळखले जातात. प्राण्यांच्या आत विशिष्ट ठिकाणी औषधं पोहोचवण्यासाठी ई. कोलाईमध्ये बदल करता येतात, असं टीमने स्पष्ट केलं आहे. मात्र एकदा आत गेल्यानंतर, बॅक्टेरिया नियंत्रित करता येत नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
अभ्यासासाठी, लेखकांनी प्रकाशाचा वापर करून "स्मार्ट" कॅप्सूलशी संवाद साधण्यासाठी ई. कोलाई डिझाईन केलं आहे. सर्किट बोर्ड असलेलं आणि बॅटरीद्वारे चालवलं जाणारं कॅप्सूल हे तोंडावाटे खाण्यायोग्य असेल अशा स्वरुपात विकसित केलं गेलं.
कोलायटिस असलेल्या तीन डुकरांनी स्मार्ट कॅप्सूल खाल्लं, ज्याने आतड्यातील बॅक्टेरियाद्वारे उत्सर्जित होणारा प्रकाश शोधला आणि तो ब्लूटूथद्वारे कॅप्सूलशी जोडणाऱ्या स्मार्टफोन ॲपवर रिले केला, असं संशोधकांनी सांगितलं. ॲपद्वारे टीमने कॅप्सूलला एलईडी फ्लॅश करून प्रकाश उत्सर्जित करण्यास निर्देशित केले, ज्यामुळे नंतर ई. कोलायमध्ये प्रकाश-संवेदनशील अनुवांशिक सर्किट चालू झाला. कृत्रिम बॅक्टेरिया सजीवांच्या आत कसे वागतात यावर नियंत्रण, तंत्रज्ञान सूक्ष्मजीवांचा वापर करणारं निदान आणि उपचारांची अचूकता वाढवू शकतं, असं टीमने म्हटलं आहे. तसेच एक दिवस मानवी रोगांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर करण्यास परवानगी दिली जाऊ शकते असंही म्हटलं आहे.