Liver Health : आजकाल लिव्हरच्या वेगवेगळ्या समस्या खूप वाढल्या आहेत. फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस या तर फार कॉमन झाल्या आहेत. अशात लोक लिव्हर फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. हे करत असताना अनेकांना असाही प्रश्न पडतो की, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तेल चांगलं असतं की तूप? बऱ्याच लोकांना असंही वाटतं की, तेल किंवा तुपामुळे त्यांचं लिव्हर फॅटी होईल. पण यात किती तथ्य आहे हे पाहुया.
डॉ. आशीष कुमार यांनी जागरण डॉट कॉमला सांगितलं की, तेल आणि तूप या दोन्ही गोष्टी काही विष नाहीत. त्यामुळे या गोष्टींचा आहारात समावेश करायला अजिबात घाबरू नका. या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फक्त त्या योग्य पद्धतीनं आणि योग्य प्रमाणात घेतल्या पाहिजे.
घातक नाही तेल-तूप
तूप आणि तेलाला अनेकदा आरोग्य बिघडण्याचा दोष दिला जातो. पण हे सत्य नाहीये. या गोष्टींचं योग्य प्रमाणात सेवन करणं सुरक्षित असतं. पण समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा यांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला जातो.
डॉक्टर सांगतात की, तेल आणि तूप दोन्हींमध्ये कॅलरी खूप जास्त असतात. अशात जर या गोष्टी जास्त खाल तर शरीरात एक्स्ट्रा कॅलरी जमा होऊ लागतात, ज्यामुळे वजन वाढतं आणि वजन वाढल्यानं पुढे जाऊन फॅटी लिव्हरसारखी समस्या होऊ शकते.
तूप आणि तेल खावं किती प्रमाणात?
जर तुम्हालाही तूप खाणं पसंत असेल तर दिवसातून १ ते २ चमचे तूप खाणं ठीक आहे. यापेक्षा जास्त तूप खाऊ नये. डॉक्टर सांगतात की, तेल आणि तूप मिळून एकूण ३ ते ४ चमचे प्रमाण ठीक आहे.
तेलाचा वापर करण्याच्या पद्धती
तेलाचं केवळ प्रमाण योग्य असून चालत नाही तर कसा आणि कोणत्या तेलाचा वापर करत आहात हेही तेवढंच महत्वाचं ठरतं.
एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करू नका, खासकरून रिफाइंड तेल. असं केल्यानं त्यात नुकसानकारक तत्व तयार होतात.
तेल नेहमीच बदलून वापरलं पाहिजे. जसे की, कधी मोहरीचं तेल, कधी फल्ली तेल, कधी सूर्यफुलाचं तेल तर कधी ऑलिव्ह ऑइल. हा बदल लिव्हरसाठी फायदेशीर ठरतो.
डीप फ्राय किंवा जास्त तळलेले-भाजलेले पदार्थ टाळावेत. कारण यांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, हे लिव्हरचं नुकसान करतं.
सगळेच तेल-तूप खाऊ शकतात का?
डॉक्टर यावर सांगतात की, जर तुम्ही हेल्दी असाल किंवा फॅटी लिव्हरच्या सुरूवातीच्या स्टेजवर असाल तर तूप आणि तेल कमी प्रमाणात खाणं सुरक्षित ठरतं. जर लिव्हरसंबंधी काही गंभीर समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.