Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सायलेंट किलर! डोक्यातील उवा ठरू शकतात जीवघेण्या; १२ वर्षीय मुलीचा मृत्यू, नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:31 IST

डोक्यातील उवांच्या गंभीर संसर्गामुळे त्रस्त असलेल्या एका १२ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोक्यातील उवांच्या गंभीर संसर्गामुळे त्रस्त असलेल्या एका १२ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बालंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंपागडा साही भागातील आहे. या घटनेने ग्रामीण भागातील मुलांचं आरोग्य आणि वेळेवर उपचार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीप्रिया साहू असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव असून ती सहावीत शिकत होती. पालकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून ती डोक्यातील उवांमुळे त्रस्त होती. सुरुवातीला ही एक सामान्य समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, मात्र काळानुसार या संसर्गाने गंभीर रूप धारण केलं. मुलीच्या आईने तिला संसर्ग टाळण्यासाठी केस कापण्याचा सल्ला दिला होता, पण मुलगी त्यासाठी तयार नव्हती. याच दरम्यान उवांचा संसर्ग संपूर्ण डोक्यात पसरला. 

अचानक रक्ताच्या उलट्या

उवांमुळे येणारी दुर्गंधी आणि सततच्या त्रासामुळे ती मानसिकदृष्ट्याही खचली होती आणि तिने घराबाहेर पडणं बंद केलं होते. केस नेहमी बांधलेले असल्याने संसर्ग किती वाढला आहे, याचा अंदाज कुटुंबातील इतर सदस्यांना येऊ शकला नाही. तीन दिवसांपूर्वी मुलीला अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ पुरी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

तज्ज्ञ काय म्हणतात?

बहुतेक आरोग्य तज्ज्ञ आणि संशोधनानुसार, उवांचा संसर्ग सहसा जीवघेणा नसतो. मात्र, 'ScienceDirect' या वैज्ञानिक वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, उवा या मानवी रक्तावर जगणारे बाह्य परजीवी आहेत. ही समस्या लहान मुलं आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये अधिक आढळते. सामान्यतः उवा थेट कोणताही आजार पसरवत नाहीत, त्यामुळे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण संसर्ग दीर्घकाळ राहिल्यास त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

या संशोधनात एका जुन्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. २६ ऑगस्ट २०२० रोजी अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात एका १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. तपासात असं समोर आलं की, तिच्या मृत्यूचं प्राथमिक कारण 'कार्डियाक अरेस्ट' होतं, जो उवांमुळे झालेल्या तीव्र 'ॲनिमिया'मुळे आला होता. तिच्या डोक्यात उवांची संख्या इतकी जास्त होती की, सतत रक्त शोषल्यामुळे तिच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण अत्यंत कमी झालं होतं. जर एखाद्या मुलाच्या डोक्यात हजारो उवा असतील आणि त्या दिवसातून अनेक वेळा रक्त शोषत असतील, तर रक्ताचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते. विशेषतः कुपोषित किंवा आधीच अशक्त असलेल्या मुलांसाठी हे जीवघेणं ठरू शकतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Silent Killer: Lice can be deadly; 12-year-old girl dies.

Web Summary : A 12-year-old girl in Odisha died from a severe lice infestation. Neglected for months, the infestation led to anemia and ultimately, cardiac arrest. Experts warn that while uncommon, severe lice infestations can be fatal, especially in malnourished children, due to extreme blood loss.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सओदिशामृत्यूडॉक्टर