What happens if you drink 3 litres of water a day: पाणी आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक गोष्टींपैकी एक आहे. ते आपल्याला केवळ हायड्रेट ठेवत नाही, तर त्वचा, पचन, केस आणि एकूण आरोग्य सुधारण्यासही मदत करतं. याबाबत न्यूट्रिशनिस्ट वेनिका जैन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ३० दिवस रोज ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर एखादी व्यक्ती ३० दिवस नियमितपणे ३ लिटर पाणी पित असेल, तर शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. चला ते समजून घेऊया.
पहिला आठवडा
पहिल्या आठवड्यात आपल्याला सतत टॉयलेटला जावं लागू शकतं, कारण किडनी शरीरात जमा झालेले टॉक्सिन आणि एक्स्ट्रा जंक बाहेर टाकू लागतात. काही दिवसांनी लघवीची ही वारंवारता कमी होते. तसेच शरीरातील अतिरिक्त मीठ बाहेर पडू लागतं, ज्यामुळे सूज आणि ब्लोटिंग कमी जाणवते. ही शरीराच्या आत सुरू होणाऱ्या स्वच्छतेची पहिली प्रक्रिया असते.
दुसरा आठवडा
दुसऱ्या आठवड्यात त्वचेत स्पष्ट बदल दिसू लागतात. पाणी त्वचेच्या पेशींना हायड्रेट करत असल्यामुळे चेहरा नॅचरली चमकू लागतो. त्वचा मुलायम आणि स्मूद दिसते. पचन सुधारतं, मोठ्या आतड्यातून विष्ठा सहज पास होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. तसेच पुरेसं पाणी पिल्यास शरीर भरल्यासारखे वाटते, त्यामुळे खाण्याची क्रेविंगही कमी होते.
तिसरा आठवडा
तिसऱ्या आठवड्यात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारते. रक्ताचा मोठा भाग पाण्याने तयार होत असल्यामुळे, पुरेसे पाणी प्यायल्यावर ब्लड फ्लो सुधारतो आणि मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन पोहोचतो. त्यामुळे मानसिक स्पष्टता वाढते. याशिवाय, पाणी स्नायूंना रिलॅक्स करते, त्यामुळे मसल पेन देखील कमी जाणवतो.
चौथा आठवडा
एका महिन्याच्या शेवटी केस आणि नखांमध्येही बदल दिसू लागतात. पाणी पोषक घटकांना शरीराच्या योग्य भागांपर्यंत पोहोचवण्यात मदत करते, त्यामुळे केस आणि नखांची वाढ सुधारते. रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. पुरेसे पाणी पिल्याने शरीराची संपूर्ण सिस्टम अधिक प्रभावीपणे काम करते.
म्हणजेच काय तर रोज ३ लिटर पाणी पिणे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. मात्र, ज्यांना किडनी किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी पाण्याचे प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवावे.
