Join us

नवरात्र उपवास करताना खूप भूक लागली तर? पचायला हलक्या-पौष्टिक ५ गोष्टी तयार ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2024 12:09 IST

Navratri Fasting healthy diet tips : उपवास सुरू होण्याआधी काही किमान गोष्टींची तयारी हवी, ऐनवेळची धावपळ वाचेल

नवरात्रीत ९ दिवसांचे उपवास करण्याची पद्धत बहुतांश घरांमध्ये असते. उपवास म्हटला की उपवासाचे पदार्थ आणि नेहमीचा स्वयंपाक वेगळा असे दोन्ही करावे लागते. घरातले, बाहेरचे आणि देवीचे सगळे करता करता बरेचदा उपवासाचे वेगळे काही करण्याचा कंटाळा केला जातो. बहुतांशवेळा उपवास हा घरातील महिला वर्ग करत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे पुरेसे लक्ष दिले जातेच असे नाही (Navratri Fasting healthy diet tips). 

जेवणाच्या वेळेला साबुदाणा, भगर, थालिपीठ असे नीट काहीतरी खाल्ले जाते. पण सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा मधल्या वेळेला भूक लागल्यावर मात्र घरात उपवासाचे काही असतेच असे नाही. मग त्यावेळी भूक मारली गेली तर अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास सुरू होण्याआधी काही किमान गोष्टींची तयारी करुन ठेवली तर आरोग्याची हेळसांड होत नाही. पाहूयात यासाठी नेमकं काय करुन ठेवता येईल...

(Image : Google)

१. शेंगदाणा, सुकामेवा लाडू

लाडू हा उपवासादरम्यान झटपट तोंडात टाकता येईल असा पदार्थ असतो. शेंगदाण्याचा कूट, गूळ आणि तूप यांचा लाडू करायला सोपा आणि झटपट एनर्जी देणारा असतो. याशिवाय खजूर, सुकामेवा, सुकं खोबरं यांचेही लाडू करुन ठेवता येऊ शकतात. यामध्ये साखर-गूळ पोटात जात नाही मात्र घाईच्या वेळी भूक लागली तर पोटाला आधार होऊ शकतो. घरी हे लाडू करणे सोपे असते. पण तेवढाही वेळ नसेल तर हल्ली घरगुती असे लाडू करुन मिळतात ते आणून ठेवता येतात. 

२. फळांचा पर्याय केव्हाही उत्तम

फळं हा उपवासाच्या काळात खाण्यासाठी उत्तम पर्याय असतो. त्यामुळे उपवास सुरू होण्याआधीच बाजारातून फळं, नारळ पाणी, काकडी अशा ताज्या गोष्टी २-४ दिवसांसाठी आणून ठेवाव्यात. सकाळच्या वेळी किंवा ५ वाजता भुकेच्या वेळी चहा-कॉफी किंवा तेलकट काही खाण्यापेक्षा फळांचा पर्याय उत्तम ठरतो. 

३. दूध-दही मुबलक हवे

उपवासाच्या आधी दूध, दही, ताक यांचे योग्य पद्धतीने नियोजन करुन ठेवाव. दूध आणि सुकामेवा यांची स्मूदी, थंडाई किंवा अगदी नुसते कपभर दूध आणि राजगिरा असे घेता येते. ताजे दही असेल तर नुसते वाटीभर दही खाल्ले तरी बरीच एनर्जी येते. ताक पचनासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी अतिशय चांगले असल्याने घरच्या घरी दुधाचे दही लावल्यास नियमित ताक करु शकता. मात्र त्यासाठी योग्य नियोजन असायला हवे. 

४. नमकीन खायची इच्छा झाली तर

काहीवेळा आपल्याला एकदम एनर्जी डाऊन झाल्यासारखे वाटते आणि काहीतरी नमकीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपण बाजारात मिळणारे वेफर्स, साबुदाण्याचा किंवा बटाट्याचा चिवडा असे काहीबाही खातो. त्यापेक्षा आधीच वाळवणात होणाऱ्या साबुदाण्याच्या पापड्या, उपवासाच्या चकल्या, बटाटा पापड असे आणून ठेवले तर ऐनवेळी ते तळून खाता येते. मात्र ही तयारी आधीपासून करायला हवी.

५. कोरडा खाऊ 

यामध्ये राजगिरा, खजूर हे पर्याय तर असतातच पण हल्ली बाजारात उपवासाला चालतील अशी बिस्कीटे, विविध प्रकारचे चिवडे असं काही ना काही मिळतं. तर सोबत कॅरी करण्यासाठी किंवा घरात खाण्यासाठीही अशाप्रकारचा थोडा खाऊ आधीच आणून ठेवला तर ऐनवेळी होणारी धावपळ वाचू शकते.  

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीआरोग्यआहार योजनाहेल्थ टिप्स