भारतीय आहारात मसूरडाळ हा एक अत्यंत पौष्टिक आणि सर्वसामान्य घटक आहे. तिचा रंग, चव सगळ्यांना आवडते. शिवाय ही डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे ती अनेक घरांमध्ये आवडीने खाल्ली जाते. (Lentils are a treasure trove of nutrition - masoor dal is a must have food for proteins )जरी ती एक साधी डाळ वाटत असली तरी आरोग्यासाठी ती अमूल्य असते. त्यामुळे आहारात तिचा समावेश करुन घ्या. मसूर डाळीत मोठ्या प्रमाणात पोषण असते.
मसूरडाळमध्ये प्रथिने, लोह, पोटॅशियम, फोलेट, आणि जीवनसत्त्व बी सारखी पोषणतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. ही डाळ शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानली जाते. शरीरातील रक्तनिर्मितीसाठी आवश्यक असलेले लोह यात मुबलक असते, त्यामुळे अॅनिमिया (रक्तअल्पता) टाळण्यास मदत होते. तसेच फायबर असल्यामुळे पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते.
आरोग्याबरोबरच मसूरडाळ सौंदर्यवर्धनासाठीही उपयुक्त ठरते. तिचा फेसपॅक त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. मसूरडाळ भिजवून त्याची पेस्ट तयार करुन चेहर्यावर लावल्यास त्वचेवरील मळ, तेलकटपणा आणि काळे डाग कमी होतात. त्यामुळे चेहरा उजळ आणि तजेलदार दिसतो. मसूरडाळ केवळ आरोग्य आणि सौंदर्यापुरतीच मर्यादित नाही, तर स्वयंपाकघरात तिचा वापर अनेक प्रकारे करता येतो. तिची आमटी, वरण, किंवा मसूरभात हे सर्व लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहेत. मसूरडाळीचे सूप, पराठा किंवा खिचडीही पौष्टिक असते. करायला सोपे असे हे पदार्थ चवीलाही मस्त असतात.
थोडक्यात सांगायचे झाले तर मसूरडाळ हा आपल्या दैनंदिन आहारातील एक छोटासा घटक असला तरी आरोग्य आणि सौंदर्य यासाठी फायदेशीर आहे. ती शरीराला पोषण, त्वचेला तजेला आणि मनाला समाधान देते. म्हणूनच ही डाळ खाच तसेच त्याबरोबरच तिचे इतरही वापर करा.