डोकं खाजणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. काही लोकांना कोंडा असल्यामुळे खाज सुटते, पण कधी कधी कोंडा नसतानाही डोक्यात सतत खाज येते. अशावेळी प्रश्न पडतो, खाज सुटण्यामागे नक्की कारण काय असू शकतं? चला, डोकं खाजण्याची सामान्य कारणे आणि त्यावरचे सोपे उपाय जाणून घेऊया. (Itchy scalp? never ignore it, it can cause serious problems, see what to do )कधी कधी हवामानातील बदल, ताण, केसासाठी वापरली जाणारी रासायनिक उत्पादकं, किंवा त्वचेचा कोरडेपणा यामुळेही डोकं खाजू लागतं. सुरुवातीला आपण कोंडा आहे असं समजून शॅम्पू बदलतो, पण खाज कायम राहते. कारण ही केवळ बाह्य समस्या नसून त्यामागे अनेक कारणे असू शकतात.
कोंडा हा सर्वाधिक सामान्य कारण आहे. डोक्याच्या त्वचेवरील तेलकटपणामुळे मॅलेसिझिया नावाचा सूक्ष्म बुरशीजन्य जीव वाढतो. तो त्वचेला सूज आणतो आणि त्यामुळे खाज सुटते. पण, काही वेळा कोंडा बरा झाल्यानंतरही डोक्यात खाज राहते. हे त्वचा कोरडी पडल्यामुळे किंवा केसासाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादकांमधील रसायनांमुळे होते. सतत गरम पाण्याने डोकं धुणं, विविध शाम्पू वापरणं किंवा वारंवार तेल लावून ते बराच वेळ ठेवणं या सवयींमुळेही त्वचा खाजते.
अनेकांना हे माहिती नसतं की मानसिक ताणसुद्धा खाज वाढवतो. ताण वाढल्यावर मेंदूतील सिग्नल्स त्वचेकडे चुकीचे संदेश पाठवतात आणि त्यामुळे neurogenic itching निर्माण होते. ही खाज शरीरात कोणतीही जखम किंवा बुरशी नसतानाही जाणवते. काही लोकांमध्ये सेबोरिक डर्माटायटिस किंवा सोरायसिससारखे त्वचारोगही खाज निर्माण करतात. या वेळी त्वचा लालसर होते, सोलते आणि थोडं दुखणं जाणवतं. अशा परिस्थितीत साधे घरगुती उपायही खूप उपयोगी ठरतात. कोरफड जेल डोक्याच्या त्वचेला थंडावा देऊन खाज कमी करतो. टी ट्री ऑइलमध्ये बुरशीरोधक आणि जंतुरोधक गुण असतात, तर लिंबाचा रस त्वचा स्वच्छ ठेवतो आणि कोंडा कमी करतो. पण हे सर्व उपाय करताना संयम आणि नियमितता गरजेची आहे.
डोक्याच्या त्वचेची स्वच्छता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आठवड्यातून दोनदा सौम्य शॅम्पू वापरा, गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने केस धुवा आणि केस कोरडे झाल्यावरच तेल लावा. केसांच्या उत्पादकांचा अति वापर टाळा, विशेषतः सुगंधी किंवा रासायनिक द्रव्ये टाळा. जर खाज सतत राहते, केसगळती वाढते किंवा लाल पुरळ दिसू लागते, तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण काही वेळा ही लक्षणं संसर्गाची किंवा त्वचारोगाची चिन्ह असतात.
